वॉशिग्टन – कट्टरपंथिय संघटनांचा विस्तार तसेच आर्थिक आणि सामाजिक समस्यांमुळे आफ्रिकेच्या साहेल भागावर भीषण आपत्ती कोसळण्याच्या बेतात आहे. साहेल भागावरील हे संकट आफ्रिका खंडाचे भविष्य धोक्यात टाकणारे ठरेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय समुदाय देत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये माली, नायजर, नायजेरिया, बुर्कीना फासो, छाड, सुदान या देशांमधील दहशतवादी आणि कट्टरपंथियांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने ही चिंता व्यक्त केली आहे.
साहेल भागातील देशांमधील तरुणांना सशस्त्र कट्टरपंथिय गटांमध्ये सामील होण्यापासून परावृत्त करण्यात आंतरराष्ट्रीय समुदाय अपयशी ठरला आहे. यामुळे या भागातील हिंसाचार वाढला असून मानवतावादी संकट अधिकच भीषण होत चालले आहे. साहेल आणि पश्चिम आफ्रिकी भागातील हा हिंसाचार येत्या काळात आफ्रिका खंड आणि त्याच्या पलिकडे असलेल्या आमच्या भविष्यासाठी धोकदायक ठरेल, असा इशारा अमेरिकेतील युरोपिय महासंघाचे राजदूत स्टॅव्हरोस लॅम्ब्रिनीडिस यांनी दिला आहे.