वॉशिंग्टन – कोरोनाच्या साथीची दुसरी लाट येण्याबाबत व्यक्त होणारी भीती खरी ठरत असल्याचे संकेत नव्या आकडेवारीतुन समोर येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या पाच हजारांहून अधिक नोंदविण्यात आली असून रुग्णांच्या संख्येतही सुमारे सव्वा लाखांची भर पडली आहे. आफ्रिका खंडातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन लाखांवर जाऊन पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘अस्ट्रा झेनेका’ या ब्रिटिश कंपनीने आपली लस ऑक्टोबर महिन्यापासून उपलब्ध होऊ शकते, असे संकेत दिले आहेत.
‘वर्ल्डओमीटर’ वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ७३,६९,२०९ झाली असून गेल्या २४ तासांमध्ये त्यात १,२३,३८२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या २४ तासात कोरोनाच्या बळींच्या संख्येत तब्बल ५,१२९ जणांची वाढ झाली असून एकूण बळीची संख्या ४,१४,८५३ झाली आहे. जगभरात आतापर्यंत एकूण ३६,३७,२३० रुग्ण कोरोना साथीतून बरे झाले आहेत.
अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या ९२६ बळींची नोंद झाली असून एकूण बळींची संख्या १,१४,२७७ झाली आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या २०,४९,२५१ झाली असून २४ तासांमध्ये त्यात १७ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. अमेरिकेनंतर कोरोनाच्या साथीचा सर्वाधिक फटका बसलेल्या ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ३१ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७,४३,०४७ झाली आहे. त्याचवेळी कोरोनाच्या साथीत बळी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ३८,५४३ झाली असून २४ तासांमध्ये त्यात १,२३१ बळींची भर पडली आहे.
‘आफ्रिका सिडीसी’ या संस्थेने आफ्रिका खंडातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २,०२,७८२ झाल्याची माहिती दिली आहे. ही माहिती आफ्रिका खंडातील ५४ देशांची असून बळींची संख्या ५,५०६ झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, यूरोपातील ‘ओईसीडी’ या आघाडीच्या गटाने यावर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसण्याचे भाकित केले असून सहा टक्क्यांनी घसरण होईल असा दावा केला आहे.