बमाको – बुधवारी मध्य मालीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात माली लष्कराच्या १० जवानांचा बळी गेला आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असणार्या ‘जीएसआयएम’ या गटाने हा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. अवघ्या १० दिवसांच्या अवधीत मालीच्या लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला असून यापूर्वी झालेल्या हल्ल्यात सहा जवानांचा बळी गेला होता. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, फ्रान्समधील गुप्तचर यंत्रणांनी मालीस्थित दहशतवादी गट युरोपात हल्ले चढवू शकतात, असा इशारा दिला आहे.
मध्य मालीतील मोपती प्रांतात असलेल्या बोनीमधील लष्करी तुकडीवर बुधवारी पहाटे हल्ला चढविण्यात आला. सशस्त्र वाहनांमधून आलेल्या दहशतवाद्यांनी रायफल्स तसेच ग्रेनेडच्या सहाय्याने लष्करी तुकडीला लक्ष्य केले. हल्ल्यात १० जवानांचा बळी गेला असून किमान सहा जण जखमी झाले आहेत. बोनीमधील लष्करी तळाचे नुकसान झाले असून दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा लुटून नेल्याची माहितीही अधिकार्यांनी दिली.
गेल्या १० दिवसात मोपती प्रांतात झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे. रविवारी २४ जानेवारी रोजी मोपती प्रांतातील ‘मोंदोरो’ व ‘बौल्केसी’मधील लष्करी तुकड्यांवर हल्ले करण्यात आले होते. त्यात सहा जवानांचा बळी गेला होता व १८ जण जखमी झाले होते. यावेळी माली लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ४० दहशतवाद्यांचा बळी गेला होता. मात्र या कारवाईनंतरही पुन्हा एकदा दहशतवादी गटांनी लष्करी तळाला लक्ष्य करीत आपली वाढती ताकद दाखवून दिली आहे.
बुधवारी मालीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सकडूनही चिंतेचे सूर उमटले आहेत. फ्रेंच गुप्तचर यंत्रणा ‘डीजीईएस’चे प्रमुख बर्नार्ड एमी यांनी, मालीतील दहशतवादी गट युरोपात हल्ले चढविण्याच्या हालचाली करीत असल्याचा इशारा दिला. आयएस, अल कायदा व या संघटनांशी संलग्न असलेले गट मालीतून फ्रान्स तसेच फ्रान्सच्या सहकारी देशांवर हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचे एमी यांनी बजावले. गेल्याच महिन्यात मालीतील दहशतवादी गटांनी फ्रेंच लष्करी तुकडीवर केलेल्या हल्ल्यात दोन जवानांचा बळी गेला होता.
गेल्या वर्षी मालीत लष्कर व समर्थक गटांनी बंड करून राष्ट्राध्यक्ष इब्राहिम कैता यांची राजवट उलथून लावली होती. २०१२ सालानंतर मालीत लष्करी बंड होण्याची ही दुसरी वेळ ठरली होती. त्यावेळी झालेला बंडाचा गैरफायदा घेत तुआरेग बंडखोर गट व दहशतवादी संघटनांनी देशातील महत्वाची शहरे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. या संघर्षात तत्कालिन सरकारच्या सहाय्यासाठी फ्रान्सने लष्करी हस्तक्षेप केला होता.
त्यानंतर मालीतील दहशतवाद रोखण्यासाठी फ्रान्सच्या लष्करी पथकासह संयुक्त राष्ट्रसंघटनेचे शांतीसैनिक आणि अमेरिकेचे सल्लागार देशात दाखल झाले होते. मात्र तरीही गेल्या काही वर्षात मालीतील लष्करावर होणारे दहशतवादी हल्ले सातत्याने वाढत असल्याचे समोर आले होते. त्यावर नियंत्रण मिळविण्यात सरकारलाही अपयश आले होते. गेल्या वर्षी झालेल्या बंडानंतर मालीतील राजकीय अस्थैर्य अद्याप कायम असून त्याचा फायदा उचलून दहशतवादी गटांनी पुन्हा एकदा आपल्या हल्ल्यांची तीव्रता वाढविल्याचे गेल्या १० दिवसात झालेल्या हल्ल्यांवरून दिसून येत आहे.