कानो – नायजेरियाच्या कदुना प्रांतात दहशतवाद्यांनी ख्रिस्तधर्मियांच्या प्रार्थनास्थळावर केलेल्या हल्ल्यात आठ जणांचा बळी गेला. तर दहशतवाद्यांनी 38 जणांचे अपहरण केले असून यामध्ये प्रार्थनास्थळातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. गेल्या आठवड्याभरात नायजेरियातील प्रार्थनास्थळावर झालेला हा दुसरा हल्ला आहे.
रविवारी दहशतवाद्यांनी कदुना प्रांतातील काजुरू येथील प्रार्थनास्थळावर हल्ला केला. सुरुवातीला दहशतवाद्यांनी गोळीबार करून उपस्थितांचे अपहरण केले. तसेच शेजारच्या चार गावांमध्येही दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला. गेल्या आठवड्यातही दहशतवाद्यांनी कदुना प्रांतातील आणखी एका प्रार्थनास्थळावर हल्ला चढविला होता. यामध्ये 32 जणांचा बळी गेला होता. या हल्ल्यांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण नायजेरियातील आयएससंलग्न दहशतवादी संघटना यामागे असल्याचा दावा केला जातो.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 17 महिन्यांमध्ये नायजेरियातील ख्रिस्तधर्मियांच्या प्रार्थनास्थळांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात असून इथल्या 35 हून अधिक धर्मोपदेशकांचे अपहरण किंवा हत्या झाल्याचे दावे केले जातात. यामुळे स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून हे हल्ले रोखण्यात आलेल्या अपयशामुळे सरकारविरोधात रोष वाढत आहे.