अफगाणिस्तानात अजूनही दहशतवादाचे तळ आहेत

- रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

दहशतवादाचे तळमॉस्को – अफगाणिस्तान आजही दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटनांचेच आहे. त्यामुळे शेजारी देशांमध्ये अस्थैर्य निर्माण होऊ शकते, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. आठवडाभरापूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील रशियाच्या दूतावासावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये रशियाच्या दोन राजनैतिक अधिकाऱ्यांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर माजी सोव्हिएत देशांच्या सुरक्षेबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलताना रशियन राष्ट्राध्यक्षांनी हा इशारा दिला.

तालिबानने अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित केल्यानंतर वर्षाहून अधिक कालावधी उलटला. या काळात रशियाचा अपवाद वगळता जगभरातील जवळपास सर्वच देशांनी तालिबानच्या राजवटीला मान्यता देणार नसल्याचे सांगून अफगाणिस्तानातील आपले दूतावास बंद ठेवले होते. रशियाने तालिबानच्या राजवटीला मान्यता दिली नसली तरी राजनैतिक स्तरावरील व्यवहार सुरूच ठेवले आहेत. तालिबान आणि नॉर्दन अलायन्स या अफगाणिस्तानातील दोन गटांना एकत्र आणण्यासाठी रशियाने मध्यस्थी सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. रशिया आणि तालिबानमधील हे सहकार्य अफगाणिस्तानच्या शेजारील माजी सोव्हिएत रशियन देशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मानले जाते.

दहशतवादाचे तळपण गेल्या महिन्यात राजधानी काबुलमधील रशियन दूतावासात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने रशियाला धक्का दिला. यात रशियाच्या दोन राजनैतिक अधिकाऱ्यांचा बळी गेला होता. रशिया आणि तालिबानमधील सहकार्याला हादरा देणारा हा हल्ला असल्याची चर्चा सुरू झाली होती. दोन दिवसांपूर्वी ‘कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्‌‍स- सीआयएस’ या माजी सोव्हिएत देशांच्या गुप्तचर यंत्रणेच्या बैठकीत बोलताना, रशियन राष्ट्राध्यक्षांनी काबुलमधील हल्ल्यावर चिंता व्यक्त केली.

‘अफगाणिस्तानात फारच कठीण परिस्थिती निर्माण होत आहे. दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटना अफगाणिस्तानात जोर पकडत आहेत. गेल्या महिन्यात रशियन दूतावासावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने हेच दाखवून दिले’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन सीआयएसच्या बैठकीत म्हणाले. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचे अफगाणिस्तानातील तळ शेजारी देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावेळी दिला. या संघटना अफगाणिस्तानात दहशतवाद्यांचे भरती केंद्र सुरू करू शकतात, या समस्येकडे रशियन राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले.

या दहशतवादी हालचालींना वेळीच प्रत्युत्तर देणे आवश्यक असल्याचेही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले. काही वर्षांपूर्वी सिरिया आणि इराकमध्ये अस्थैर्य माजविणाऱ्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आणले गेले आहे. आता हे दहशतवादी अफगाणिस्तानच्या शेजारी देशांमध्ये अस्थैर्य माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही, असा इशारा रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिला. एकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या देशांमध्ये अस्थैर्य निर्माण व्हावे यासाठी पाश्चिमात्य देशांकडून कारस्थाने आखली जात असल्याचा गंभीर आरोपही रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला आहे.

गेल्याच महिन्यात आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन सोव्हिएत देशांमध्ये पुन्हा संघर्ष भडकला होता. त्यानंतर किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तान या आणखी दोन सोव्हिएत देशांच्या सीमेवर संघर्ष सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर रशिया अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीबरोबर सहकार्य प्रस्थापित करून अफगाणिस्तानमार्फत आपल्या प्रभावाखाली असलेल्या देशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहे. आहे. अफगाणिस्तानातील अस्थैर्याचे थेट परिणाम अफगाणिस्तानला सीमा भिडलेल्या मध्य आशियाई देशांवर होतील. एकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या या देशांच्या सुरक्षेला आव्हान म्हणजे रशियाच्या सुरक्षेलाच आव्हान ठरते. म्हणूनच रशिया अफगाणिस्तानातील घडामोडींकडे अतिशय सावधपणे पाहत असल्याचे दिसत आहे.

leave a reply