कराची – १९९९ साली घडविलेल्या कंदहार विमान अपहरण प्रकरणातील पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याची कराचीत हत्या करण्यात आली. मिस्री जहूर इब्राहिम असे या दहशतवाद्याचे नाव असून मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे. मिस्री जहूर इब्राहिम गेली अनेक वर्षे नाव बदलून कराचीत वास्तव्य करीत होता, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात हत्या झाल्याचे सांगण्यात येते.
२४ डिसेंबर १९९९ रोजी नेपाळची राजधानी काठमांडूवरून दिल्लीला येणार्या ‘आयसी-८१४’ या इंडियन एअरलाईन्सच्या प्रवासी विमानाचे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. १७८ प्रवाशांसह एकूण १९३ जणांचा समावेश असलेले हे विमान दहशतवाद्यांनी अमृतसर, लाहोर, दुबईमार्गे अफगाणिस्तानमधील कंदहारमध्ये नेले होते.
अफगाणिस्तानमधील तत्कालिन तालिबान राजवटीने या विमानाला आश्रय दिला होता.
भारत सरकारने तीन दहशतवाद्यांची सुटका केल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सदर विमान सोडून दिले होते. विमानाचे अपहरण करणार्या पाचही दहशतवाद्यांना पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने सहाय्य पुरविले होते. मिस्री जहूर इब्राहिम उर्फ झिआ हा ‘झाहिद’ हे नाव घेऊन गेली अनेक वर्षे कराचीत फर्निचरचे दुकान चालवित होता. मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी मिस्री जहूर इब्राहिमवर गोळ्या झाडल्या. या घटनेचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ही समोर आले आहे.