मॉस्को – रशियाने बुधवारी ‘सरमात’ या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. एकाचवेळी दहा स्फोटके वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात असल्याचा दावा रशिया करीत आहे. तर आपल्या या चाचणीमुळे शत्रूला यापुढे रशियाविरोधात कुठलाही निर्णय घेण्याआधी दोनवेळा विचार करावा लागेल, असा इशारा रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. युक्रेनमधील युद्धाला 58 दिवस पूर्ण होत असताना रशियाने या चाचणीद्वारे युक्रेनसह पाश्चिमात्य देशांना बजावले आहे.
रशियाचे हे सरमात क्षेपणास्त्र 11,200 मैल अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता बाळगून आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अभेद्य असा उल्लेख केलेले सदर क्षेपणास्त्र 16 हजार मैल प्रतितास इतक्या वेगाने प्रवास करते. गेल्या काही वर्षांपासून रशियाचे या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीवर काम सुरू होते. अमेरिका व नाटो या क्षेपणास्त्राच्या निर्मितीकडे अतिशय बारकाईने पाहत होते. सरमात क्षेपणास्त्र म्हणजे आपल्या सुरक्षेला धोका असल्याची चिंता पाश्चिमात्य देशांनी याआधीच व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत, बुधवारी रशियन लष्कराने उत्तरेकडील प्लेसेस्क येथील भूमिगत कोठारातून या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात युरोपसह अमेरिकेची महत्त्वाची शहरे येतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या चाचणीचे स्वागत केले. तसेच सरमातची चाचणी रशियन लष्करासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण घटना असल्याचे म्हटले आहे. आपले हे क्षेपणास्त्र जगभरातील अतिप्रगत सुरक्षा यंत्रणांवर मात करील, असा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला.
‘हे खरोखरच अनोखे क्षेपणास्त्र असून यामुळे आपल्या संरक्षणदलांची क्षमता वाढेल. तसेच या क्षेपणास्त्रामुळे बाह्य धोक्यांपासून रशियाची सुरक्षितता निश्चित होईल तसेच आक्रमकतेच्या जोरावर रशियाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांना यामुळे दोनवेळा विचार करायला भाग पाडेल’, असा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला. जगातील कुठलीही हवाई सुरक्षा यंत्रणा आपल्या या क्षेपणास्त्रासमोर अपयशी ठरेल, असा विश्वास पुतिन यांनी व्यक्त केला आहे.
रशियन अंतराळ संस्था ‘रॉसकॉसमॉस’चे संचालक दिमित्रि रोगोझिन यांनी या चाचणीच्या निमित्ताने अमेरिका व नाटोला बजावले. ही चाचणी म्हणजे नाटो आणि युक्रेनमधील नाझीवादींसाठी इशारा असल्याचे रोगोझिन म्हणाले. युक्रेनमधील राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे सरकार नाझीसमर्थक असल्याचा आरोप याआधी रशियाने केला होता. रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख देखील युक्रेनवर अशाच स्वरुपाचे आरोप करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून युक्रेनमधील संघर्ष चिघळल्यास त्याचे अणुयुद्धात रुपांतर होईल, असा इशारा रशियाकडून दिला जात आहे. यामुळे युरोपिय देश हादरले आहेत. यामुळे युरोपातली स्थिती स्फोटक बनलेली असतानाच, अमेरिका व नाटो मात्र रशियन नेतृत्त्वावर बेजबाबदारपणाचे आरोप करीत आहेत. अशा परिस्थितीत अणुस्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या सरमात क्षेपणास्त्राची चाचणी करून रशियाने अणुयुद्धाबाबत आपण दिलेले इशारे पोकळ नसल्याची जाणीव करून दिली आहे.