उत्तर कोरियाकडून नव्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

प्योनग्यँग/वॉशिंग्टन – उत्तर कोरियाने रविवारी मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे जपान व दक्षिण कोरियाकडून सांगण्यात आले. उत्तर कोरियाच्या सुनान भागातून प्रक्षेपित करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र ३०० किलोमीटर लांब अंतरावरील जपानच्या सागरी क्षेत्रात कोसळल्याची माहिती जपानी अधिकार्‍यांनी दिली. रशिया-युक्रेन युद्ध व दक्षिण कोरियात होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही नवी चाचणी लक्ष वेधून घेणारी ठरते.

रविवारी केलेल्या चाचणीत उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राने ६२० किलोमीटर्सची उंची गाठल्याची माहिती जपानने दिली आहे. ही चाचणी नव्या वर्षात घेण्यात आलेली आठवी क्षेपणास्त्र चाचणी ठरली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात उत्तर कोरियाने एकापाठोपाठ एक अशा सात क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या होत्या. त्यात आण्विक हल्ल्याची क्षमता असणार्‍या ‘ह्वासॉंग-१२’ या दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचाही समावेश होता. या चाचण्यांनंतर उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग-उन यांनी आपल्याकडे अमेरिकेला लक्ष्य करणारी घातक शस्त्रे असून आपण त्याचा वापर करु शकतो, अशी धमकीही दिली होती.

‘उत्तर कोरिया अत्यंत वेगाने बॅलस्टिक क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान विकसित करीत असल्याचे दिसत आहे. जग रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याकडे लक्ष देण्यात गुंतले असताना त्याचा फायदा उठवून उत्तर कोरियाने चाचणी केल्याचे दिसते. ही बाब खपवून घेतली जाणार नाही’, अशी टीका जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी केली. दक्षिण कोरिया तसेच जपाननेही उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीवर नाराजी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी उत्तर कोरियाकडून करण्यात येणार्‍या चाचण्या आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोका असल्याचा इशाराही दिला होता. पण तरीही चाचण्यांचे सत्र सुरू असून उत्तर कोरियाकडून एकामागोमाग होणार्‍या या चाचण्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला आव्हान देणार्‍या असल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply