बंगळुरू – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पहिल्यांदाच आपले सॅटेलाईट सेंटर खाजगी कंपन्यांसाठी खुले केले आहे. इस्रोच्या ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच बंगळुरू येथील इस्रोच्या ‘सॅटेलाईट सेंटर’मध्ये एका खाजगी कंपनीच्या दोन उपग्रहांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत इस्रो केवळ खाजगी कंपन्यांच्या उपग्रह व रॉकेटच्या वेगवेगळ्या भागांच्या निर्मितीत सहाय्य करीत होती. गेल्यावर्षी भारताचे अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या क्षेत्रात गुंतवणूक करणार्या देशी आणि परकीय कंपन्यांना आपल्या ‘स्पेसपोर्ट्स’चा वापर करण्याची परवानगी दिली होती. या पार्श्वभूमीवर इस्रोच्या सॅटेलाईट सेंटरमध्ये दोन खाजगी उपग्रहाच्या चाचण्या झाल्या आहेत.
देशाच्या अंतराळ क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून हे क्षेत्र खाजगी कंपन्यांकरीता गुंतवणुकीसाठी खुले केल्यावर कितीतरी खाजगी आणि परकीय कंपन्या आपले प्रस्ताव घेऊन समोर येत आहेत. केंद्र सरकारच्या अंतराळ विभागाने ‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अॅण्ड अॅथॉरायझेशन सेंटर’ (इन-स्पेस) ही अंतराळ नियंत्रक संस्था यासाठी स्थापन केली आहे. कंपन्या ‘इन-स्पेस’कडे आपले प्रस्ताव पाठवत आहेत. यामध्ये कितीतरी स्टार्टअप कंपन्याही आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ अर्थव्यवस्थेत पुढील काळात भारत महत्त्वाची भूमीका निभावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आपल्या इतिहासात पहिल्यांदाच इस्रोने आपले उपग्रह केंद्र अर्थात ‘सॅटेलाईट सेंटर’ खाजगी कंपनीला वापरू दिले आहे. एका भारतीय स्टार्टअप कंपनीचे ‘स्पेसकिड्ज इंडिया’ आणि ‘पिक्सल’ या दोन उपग्रहांचे बंगळुरू येथील इस्रोच्या युआर राव उपग्रह केंद्रात चाचणी घेण्यात आली. गेल्यावर्षी जून महिन्यात इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी इस्रो येत्या काळात आपली प्रयोगशाळा, चाचणी केंद्राची सुविधा व इतर पायाभूत सुविधा खाजगी कंपन्यांसाठी खुली करेल, अशी घोषणा केली होती. इस्रोचे ‘स्पेसपोर्ट्स’ खाजगी कंपन्यांना वापरण्यासाठी खुले करण्याचे जाहीर केल्यानंतर प्रथमच इस्रोच्या चाचणी केंद्रात खाजगी उपग्रहांच्या चाचण्या झाल्या आहेत.
पुढील महिन्यात इस्रो पीएसएलव्ही या आपल्या रॉकेट प्रक्षेपकाच्या सहाय्याने एका व्यावसायिक उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. पहिल्यांदाच इस्रो एखाद्या स्टार्टअप कंपनीचा उपग्रह व्यावसायिकरित्या प्रक्षेपित करणार आहे. याशिवाय ब्राझिलचा अॅमॅझोनिया-१ हा उपग्रहही पीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपित करण्याच्या तयारीत इस्रो आहे. तसेच स्कायरुट नावाची आणखी एक स्टार्टअप कंपनी प्रक्षेपक यान तयार करीत असून याची चाचणीही वर्षअखेरीस श्रीहरीकोटा येथील तळावर घेतली जाणार आहे.