‘ई-रुपया’मुळे व्यापार आणि आर्थिक व्यवहारात आमूलाग्र बदल होणार

– रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास यांचा विश्वास
– किरकोळ वापरासाठी ‘ई-रुपया’चा लवकरच शुभारंभ

मुंबई – मंगळवारपासून देशात होलसेल अर्थात घाऊक वापरासाठी ‘डिजिटल चलना’ची चाचणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी २७५ कोटी रुपयांचे व्यवहार या ‘ई-रुपया’च्या माध्यमातून झाले. आता याच महिन्यात किरकोळ अर्थात रिटेल वापरासाठीही ‘ई-रुपया’चा पायलेट प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली आहे. ‘ई-रुपया’चे लॉन्चिंग हा भारतीय चलनाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरतो. या डिजिटल चलनामुळे व्यापार आणि व्यवहाराच्या पद्धतीमध्ये फार मोठे बदल होतील, असा विश्वास यावेळी गव्हर्नर दास यांनी केला. जगात असे पहिल्यांदाच होत असून आम्ही कोणत्याही घाईत नाही, असेही दास यांनी स्पष्ट केले.

trade and economic transactions‘ई-रुपया’च्या होलसेल वापराच्या करन्सीला मंगळवारी पायलेट प्रोजेक्ट म्हणून गव्हर्मेंट सिक्युरिटीज अर्थात सरकारी रोख्यांशी संबंधित सेकंडरी मार्केटमधील व्यवहाराकरिता लॉन्च करण्यात आले. हळूहळू इतर घाऊक व्यवहारासाठी भारताची ही डिजिटल करन्सी वापरात येणार आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात सीबीडीसीचे घाऊक वापरासाठी ‘सीबीडीसी-डब्ल्यू’ आणि किरकोळ वापरासाठीचे ‘सीबीडीसी-आर’ असे दोन प्रकार आहेत. यातील ‘सीबीडीसी-डब्ल्यू’ची चाचणी सुरू झाली आहे. स्वत:च्या डिजिटल चलनाचा पायलेट प्रोजेक्ट सुरू करणारी जगातील प्रमुख केंद्रीय बँकांमध्ये आरबीआय पहिली बँक आहे.

पहिल्या दिवशी बँकांनी या करन्सीचा वापर करीत २७५ कोटी रुपयांच्या रोख्यांचे व्यवहार केले. या पार्श्वभूमीवर आणि आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या घटनेला ऐतिहासिक घोषित केले. या करन्सीमुळे व्यवहारात आणि व्यापाराच्या पद्धतीत फार मोठे बदल घडून येणार आहेत, असा दावा त्यांनी केला.

तसेच रिटेल वापरासाठीचे डिजिटल चलन ‘सीबीडीसी-आर’ अर्थात ‘ई रुपी-आर’ची चाचणी याच महिन्यात सुरू होणार असल्याची घोषणा दास यांनी केली. यासंदर्भातील तारीख लवकरच घोषित केली जाईल. पण या दोन्ही ई-चलनाचा वापर पूर्ण क्षमतेने कधी सुरू होईल, याबाबतही निश्चित तारीख सांगणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्ण क्षमतेने हे चलन सुरू करायचे आहे. मात्र यासाठी कोणताही कालावधी ठरविण्यात आलेला नाही. कारण आम्ही कोणत्याही घाईत नाही. तसेच जगातही हे पहिल्यांदाच घडत आहे, ही बाब दास यांनी अधोरेखित केली.

तंत्रज्ञानाच्या आघाडीवर काही आव्हाने असू शकतील, तसेच प्रक्रियेच्या आघाडीवरही आव्हाने समोर येऊ शकतील. हे सर्व चाचणीदरम्यान लक्षात येईल. त्यामुळे सर्व बाजूंचा विचार करून हळूहळू पुढे जाणार आहोत. यासंदर्भात बोलताना त्यांनी शेती कर्ज वाटपाच्या डिजिटलायझेशनदरम्यान आलेला अनुभव त्यांनी सांगितला. तसेच अशाच प्रकारचे डिजिटलाईज कर्ज वाटप आपण लहान उद्योगांसाठीही २०२३ पासून सुरू करीत आहोत, अशी माहिती गव्हर्नर दास यांनी यावेळी दिली.

रुपयाच्या घसरणीकडे भावनिक होऊन पाहू नका

मुंबई – भारतीय रुपयाच्या मूल्यात घसरण होत आहे. मात्र या घसरणीकडे भावनाप्रधान होऊन पाहू नका, असे आवाहन आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केले. सध्याच्या भूराजकीय घडामोडीकडे लक्ष देऊन त्या आधारावर मूल्यांकन करा. या भूराजकीय घडामोडीनंतरही भारतीय रुपया चांगले प्रदर्शन करीत आहे, असे दास म्हणाले.

‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज’ (फिक्की) आणि ‘इंडियन बँक असोसिएशन’ (आयबीए) आयोजित केलेल्या ‘एफआयबीएसी’ कॉन्फरन्समध्ये गव्हर्नर शक्तीकांत दास बोलत होते. रुपयात होत असलेल्या घसरणीवर आणि वाढत्या महागाईवर देशभरात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना अमेरिकी डॉलर वगळता सर्व प्रमुख चलनाच्या तुलतेन भारतीय रुपया मजबूत झाला आहे. तर इतर चलनांच्या मानाने भारतीय रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेत फार कमी घसरण झाली असल्याची बाब गव्हर्नर दास यांनी अधोरेखित केली.

युक्रेन युद्धानंतरही भारतीय चलन चांगली कामगिरी करीत असून भारतीय रुपया कमकुवत झालेला नसून डॉलरच्या तुलनेत अधिक स्थिर आहे, असा दावा दास यांनी केला. तसेच महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने व्याजदर वाढीसारखे उपाय करण्यास घाई केली नाही. योग्य वेळेत पावले उचलण्यात आली. आधीच अशी पावले उचलली असती आणि आक्रमक निर्णय घेतले असते, तर अर्थव्यवस्थेला मोठी किंमत चुकती करावी लागली असती, असे दास यांनी स्पष्ट केले.

leave a reply