रोम – जगभरातील जवळपास ३५ कोटी जनतेला उपासमारीच्या भयावह संकटाला तोंड द्यावे लागत असून रशिया-युक्रेन युद्धामुळे या संकटाची तीव्रता अधिकच वाढली असल्याचा इशारा ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’च्या अहवालात देण्यात आला. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेला माहिती देताना वरिष्ठ अधिकारी मार्टिन ग्रिफिथ्स यांनी जगभरात ‘त्सुनामी ऑफ हंगर’ अर्थात उपासमारीच्या त्सुनामीसह प्रचंड मोठ्या दुष्काळांना तोंड द्यावे लागेल, असे बजावले. उपासमारीच्या भयावह संकटासाठी युद्धाबरोबरच हवामानातील बदल, कोरोनाची साथ व महागाईचा भडका हे घटकदेखील कारणीभूत असल्याचे ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’च्या अहवालात नमूद करण्यात आले.
रशिया व युक्रेन हे देश ‘ब्रेड बास्केट’ म्हणून ओळखण्यात येतात. गहू, मका, बार्ली, सूर्यफूल यांच्या उत्पादनात आघाडीवर असलेले हे देश आशिया, आफ्रिका व युरोपातील अनेक देशांना अन्नधान्याचा पुरवठा करतात. मात्र फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर अन्नधान्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला होता. त्यामुळे आफ्रिका तसेच आशियाई देशांमधील स्थिती अधिकच बिघडण्यास सुरुवात झाली होती.
गेल्या दोन वर्षात कोरोनाची साथ, आर्थिक संकट व दुष्काळामुळे आफ्रिका व आशिया खंडातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नटंचाई जाणवत होती. त्यात रशिया-युक्रेन युद्धाची भर पडल्याने स्थिती भयावह झाली असून या खंडातील अनेक देशांसमोर अन्नसुरक्षा व उपासमारीच्या संकटाने गंभीर रुप धारण केले आहे. ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’चा नवा अहवाल त्याला दुजोरा देणारा ठरतो.
‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’च्या अहवालात दररोज सुमारे ८३ कोटी जनतेला उपाशी झोपावे लागर असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यातील ३४.५ कोटी जनता उपासमारीच्या संकटाचा सामना करीत आहे, तर पाच कोटींहून अधिक जण भयावह दुष्काळाचा सामोरे जात असल्याचे अहवालात सांगण्यात आले. आफ्रिका खंड, मध्य अमेरिका, अफगाणिस्तान, सिरिया व येमेन हे देश उपासमारीच्या संकटाचे ‘हॉटस्पॉट’ बनल्याचा इशाराही देण्यात आला. जगातील एकूण ८२ देश उपासमारीच्या भयावह विळख्यात अडकले असून त्यातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या सहाय्याची आवश्यकता असल्याचे आवाहनही जागतिक समुदायाकडे करण्यात आले आहे.