इराणच्या राजवटीविरोधातील आंदोलन इंधनप्रकल्पांपर्यंत पोहोचले

iran protestतेहरान – 22 वर्षाच्या माहसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये भडकलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाचे लोण शाळा, कॉलेज, बाजारपेठेपासून या देशातील इंधनप्रकल्पांपर्यंत पोहोचले आहे. इराणमधील सर्वात मोठ्या इंधनप्रकल्पासह अन्य प्रकल्पांमध्येही राजवटविरोधी आंदोलन सुरू झाल्याचे व्हिडिओज्‌‍ समोर येत आहेत. इंधनाच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या इराणसाठी हा फार मोठा धक्का ठरतो. 1978 साली इराणच्या इंधनप्रकल्पांमध्ये झालेल्या आंदोलनामुळे या देशातील इंधनाचे उत्पादनात कमालीची घट झाली होती व वर्षभरानंतर या देशात इस्लामी क्रांती झाली होती, याची आठवण विश्लेषक करून देत आहेत.

iran protest kurdsइराणमधील सर्वात मोठा आणि आखातातील सर्वात जूना इंधनप्रकल्प म्हणून कुझेस्तान या इंधनसंपन्न प्रांतातील अबादान प्रकल्पाची ओळख आहे. इराणच्या एकूण इंधन उत्पादनात अबादान प्रकल्प मोठा भागीदार असल्याचा दावा केला जातो. सोमवारी याच प्रकल्पामध्ये इराणच्या राजवटविरोधी आंदोलन सुरू होते. या प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. तसेच गेल्या चार आठवड्यांपासून इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी देशातील आंदोलकांवर केलेल्या कारवाईच्या विरोधातही या कर्मचाऱ्यांनी घोषणा दिल्याचे समोर येत आहे.

अबादानप्रमाणे इराणच्या असालूयेह व अन्य इंधनप्रकल्पांमध्येही राजवटविरोधी आंदोलन पेटल्याचे व्हिडिओज्‌‍ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. यातील बहुतांश इंधनप्रकल्प कुझेस्तान या कुर्दवंशियांची बहुसंख्या असलेल्या प्रांतात आहेत. आत्तापर्यंत इराणमधील राजवटविरोधी आंदोलने शाळा, कॉलेज, शहरातील व्यापारी पेठांपर्यंत मर्यादित होती. पण चौथ्या आठवड्यात पोहोचलेल्या या आंदोलनात कुर्द बहुसंख्य प्रांतातील इंधनप्रकल्पांचा समावेश लक्षवेधी ठरतो. इराणी सुरक्षा यंत्रणेच्या कैदेत ठार झालेली माहसा अमिनी ही तरुणी वंशाने कुर्द होती, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

iran protest refineriesइराणच्या इंधनप्रकल्पांमध्ये भडकलेले सदर आंदोलन इराणच्या राजवटीसाठी इशारा असल्याचे अमेरिकी अभ्यासगटाच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. ‘1978 साली इराण प्रतिदिन 60 लाख बॅरल्स इंधनाचे उत्पादन करीत होता. त्यावेळी इराणच्या इंधनप्रकल्पांमध्ये भडकलेल्या आंदोलनामुळे या देशातील इंधनाचे उत्पादन प्रतिदिन 15 लाख बॅरल्सपर्यंत घसरले होते. इराणमधील सरकार कोसळण्यामागच्या कारणांमध्ये या कारणाचा प्रामुख्याने समावेश होता. सध्याचा इराण प्रतिदिन 25 लाख बॅरल्स इंधनाच उत्पादन करीत आहे. त्यामुळे सध्या इंधनप्रकल्पात भडकलेली मोठी निदर्शने इराणच्या राजवटीला परवडणार नाहीत’, असा इशारा अमेरिकी अभ्यासगटाचे विश्लेषक करिम सदजादपूर यांनी दिला.

इराणमध्ये भडकलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्यांची धरपकड करणाऱ्या इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी शाळांमध्येही कारवाई सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर कुर्दांच्या वस्त्यांनाही इराणच्या सुरक्षा यंत्रणा लक्ष्य करीत असल्याचा आरोप होत आहे. गेल्या चार आठवड्यांमध्ये इराणच्या सुरक्षा यंत्रणेने केलेल्या कारवाईत 185 जणांचा बळी गेला असून यामध्ये 19 मुलांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. तर इराणमधील आंदोलकांनी सरकारी व लष्करी संकेतस्थळांवर सायबर हल्ले चढविल्याच्याही बातम्या येत आहेत.

leave a reply