अणुकराराची शक्यता अधिकच वाढलेली आहे

-इराणच्या मुख्य सल्लागारांचा दावा

nuclear-deal-has-increasedतेहरान/वॉशिंग्टन – युरोपिय महासंघाने अणुकराराबाबत दिलेल्या अंतिम प्रस्तावाला इराणने उत्तर दिले. याआधीपेक्षाही महासंघाने दिलेला हा प्रस्ताव अधिक स्वीकाहार्य असल्याचा दावा इराणच्या वरिष्ठ नेत्याने केला. पण हा प्रस्ताव म्हणजे सर्वस्व ठरत नाही, असा इशारा इराणच्या मुख्य सल्लागारांनी दिला. दरम्यान, इराणने अणुकराराच्या मोबदल्यात पाश्चिमात्य देशांकडून अधिक अपेक्षा करू नये, असे अमेरिकेने फटकारले आहे.

साधारण दोन आठवड्यांपूर्वी व्हिएन्ना येथे इराण आणि अमेरिकेमध्ये अणुकराराबाबत अप्रत्यक्ष वाटाघाटी पार पडल्या. युरोपिय महासंघाने यासाठी मध्यस्थी केली होती. युरोपिय महासंघाचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी जोसेफ बोरेल यांनी या बैठकीनंतर अमेरिका व इराणसमोर अणुकरारासंबंधी प्रस्ताव ठेवला होता. हा अंतिम प्रस्ताव असून इराण आणि अमेरिकेने त्वरीत यावर आपला निर्णय द्यावा, असे बोरेल यांनी दोन्ही देशांना बजावले होते. त्याचबरोबर या अंतिम प्रस्तावात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे बोरेल यांनी स्पष्ट केले होते.

nuclear-dealयुरोपिय महासंघाने अणुकराराबाबत दिलेला अंतिम प्रस्ताव स्वीकारण्यासाठी इराण तयार आहे. पण त्याआधी अमेरिका व युरोपिय महासंघाने इराणवरील निर्बंध शिथिल करण्याबाबत तसेच सुरक्षेबाबत हमी द्यावी, अशी मागणी इराणच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना केली होती. तर मंगळवारी याच वृत्तसंस्थेने व्हिएन्ना येथील वाटाघाटीसाठी नियुक्त केलेले सल्लागार मोहम्मद मरांदी यांच्या हवाल्याने या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली.

2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी आधी कधीही नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा अणुकरार शक्य असल्याचा दावा मरांदी यांनी केला. पण हा करार करीत असताना पाश्चिमात्य देशांनी इराणबरोबरील इतर प्रश्नही सोडवावे, असे सांगून मरांदी यांनी इराणच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. इराणवरील निर्बंध मागे घ्यावे, तसेच बायडेन प्रशासनाने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळावे, अशी मागणी इराणने केली होती. इराणच्या या मागण्या पूर्णपणे मान्य केल्या जाणार नसल्याचे महासंघाने याआधीच स्पष्ट केले होते. तर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनीही इराणने अणुकराराच्या मोबदल्यात केलेल्या मागण्यांबाबत फार मोठ्या अपेक्षा ठेवू नये, असे ठणकावले. दरम्यान, अमेरिका-इराणमधील हा अणुकरार आखातातील घडामोडींवर परिणाम करणारा ठरू शकतो.

leave a reply