प्योनग्यँग – शुक्रवारी उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवर आंतरराष्ट्रीय समुदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव गुतेरस यांनीही उत्तर कोरियाने पुढील काळात चिथावणीखोर कारवाया थांबवाव्यात असे बजावले होते. गुतेरस यांच्या वक्तव्यावर उत्तर कोरियाने टीकास्त्र सोडले आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सचिवांनी केलेले वक्तव्य ते अमेरिकेच्या हातातील बाहुले असल्याचे दाखवून देतात, असा आरोप उत्तर कोरियाच्या परराष्ट्रमंत्री चोए सन हुई यांनी केला.
शुक्रवारी उत्तर कोरियाने ‘हासाँग-17’ या नव्या प्रकारच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे जाहीर केले. अमेरिकेच्या अतिपूर्वेकडील शहरांपर्यंत मारा करू शकणाऱ्या या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीद्वारे उत्तर कोरियाने आपण अमेरिकेपेक्षाही सरस असल्याचे दाखवून दिले आहे, असा दावा सदर वृत्तसंस्थेने केला.
‘कोणत्याही अण्वस्त्रांच्या चिथावणीला उत्तर देण्याची सज्जता आपल्याकडे आहे, हे उत्तर कोरियाने या चाचणीद्वारे दाखवून दिली, हा संदेश देण्यासाठी मी येथे आलो आहे’, असे किम जाँग-उन यांनी या चाचणीनंतर जाहीर केले. त्याचबरोबर अमेरिकेच्या उत्तर कोरियाविरोधी आक्रमकतेला अण्वस्त्रांनी उत्तर मिळेल, असा इशारा किम जाँग-उन यांनी दिला. उत्तर कोरियाकडे किमान 40 अण्वस्त्रे असल्याचा दावा केला जातो.
सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाने आपल्या लष्करी धोरणात मोठा बदल केला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून उत्तर कोरियाने शत्रू देशाविरोधात ‘नो फर्स्ट यूज’ अर्थात पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर केला जाणार नाही, अशी भूमिका स्वीकारली होती. पण सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाने हुकूमशहा किम जाँग-उन यांच्या सुरक्षेला प्राथमिका देऊन अण्वस्त्रांच्या वापराबाबतचे धोरण बदलले. शत्रू देशाने हुकूमशहा किम जाँग-उन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला तर त्या देशावर थेट अण्वस्त्राचा वापर करण्याची घोषणा करून उत्तर कोरियाने आपल्या गेल्या कित्येक वर्षांच्या धोरणात बदल केला होता. त्यानंतर उत्तर कोरियाने दोन वेळा अमेरिकेला अण्वस्त्रांची धमकी दिली आहे.