नवी दिल्ली – आतून किंवा बाहेरून देशासाठी घातक ठरणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रभावीपणे समूळ उच्छेद करावाच लागेल, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. मात्र देशाला संभवणाऱ्या धोक्यांमध्ये इतर गोष्टींबरोबरच अपप्रचार हे फार मोठे आव्हान आहे, याची जाणीव पंतप्रधान मोदी यांनी करून दिली.
नेव्हल इनोव्हेशन अँड इंडेजिनायझेशन ऑर्गनायझेशन (एनआयआयओ) व ‘सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स’ (एसआयडीएम) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘स्वावलंबन 2022′ या परिसंवादाला पंतप्रधान संबोधित करीत होते. संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांच्या आघाडीवर देश स्वयंपूर्ण बनत चाललाआहे. गेल्या चार ते पाच वर्षात संरक्षणक्षेत्रातील आयात 21 टक्क्यांनी कमी झाली आहे. आता शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची सर्वाधिक आयात करणारा भारत, संरक्षणसाहित्याची निर्यात करणारा मोठा देश बनत आहे. गेल्या वर्षी देशाने 13 हजार कोटी रुपये इतक्या किमतीच्या संरक्षणसाहित्याची निर्यात केली. यातील 70 टक्क्याहून अधिक निर्यात खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी केली होती, असे सांगून पंतप्रधानांनी त्यावर समाधान व्यक्त केले. गेल्या आठ वर्षात सरकारने संरक्षणावरील खर्च वाढविण्याबरोबरच देशांतर्गत संरक्षणसाहित्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या वातावरणाची निर्मिती सरकारने केली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
देश अशारितीने प्रगती करीत असताना, देशाला संभवणाऱ्या धोक्यांची व्याप्ती वाढत चालली आहे. आत्ताच्या काळात देशाच्या संरक्षणाला केवळ जमीन, समुद्र आणि आकाशातूनच धोका नाही. याहूनही अनेक आघाड्यांवर देशाच्या सुरक्षेसमोर असंख्य आव्हाने मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करीत असताना, भारताच्या विरोधात खोटी माहिती, दुष्प्रचार याच्या मार्फत सतत हल्ले होत आहेत. अपप्रचार हे देशाच्या विरोधातील मोठे हत्यार बनविण्यात आलेले आहे, याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली.
भारताची हानी घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशातील व देशाच्या बाहेरील शक्तींचे डाव हाणून पाडायला हवेत. कारण राष्ट्रीय सुरक्षा हा केवळ देशाच्या सीमेपुरता मर्यादित राहिलेला विषय नाही. तर राष्ट्रीय सुरक्षेचा परिघ वाढला आहे. प्रत्येक नागरिकाला याची जाणीव करून देणे अतिशय महत्त्वाचे ठरते.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात काही देशांनी आपल्यावर आलेल्या संकटाचे रुपांतर संधीत केले. हे देश पुढच्या काळात शस्त्रास्त्रांचे निर्यातदार म्हणून पुढे आले. त्याच धर्तीवर भारताने देखील कोरोनाच्या संकटाचे संधीत रुपांतर केले आणि अर्थव्यवस्थेला चालना दिली व विज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेतली, असा दावा पंतप्रधानांनी यावेळी केला.