‘वंदे भारत’ मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात

नवी दिल्ली – ‘वंदे भारत’ मोहीमेच्या पहिल्या दोन टप्प्यात १ लाख ६५ हजार भारतीयांना मायदेशी आणल्यानंतर ११ जूनपासून तिसऱ्या टप्याला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात ४३ देशातून भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार असून सुमारे ४ लाख नागरिकांनी भारतात परतण्यासाठी नोंदणी केली आहे.

vande-bharatअमेरिका आणि कॅनडातून सर्वाधिक भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे. अमेरिका आणि कॅनडातून अनुक्रमे ५३ आणि २४ विमानातून भारतीयांना आणण्यात येईल तर आखाती देशातून सुमारे १७० विमान उड्डाणे होणार आहेत. तसेच दक्षिण अफ्रिकेतील सहा देशातून भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे. एअर इंडियाच्या व्यतिरिक्त खाजगी विमान कंपनीचा या मोहिमेत समावेश असेल. इंडिगोची २४ उड्डाणे आखाती देशातून आणि मलेशियातून होतील. ‘गो एअर’विमान कंपनीची आखाती देशातून तीन उड्डाणे होणार असून सिंगापूरमधून दोन उड्डाणे होतील.

वंदे भारताच्या पहिल्या दोन टप्प्यात १६५३७५ भारतीय मायदेशी आणण्यात आले होते. यामध्ये १२७७४ विद्यार्थी आणि ११,२४१ व्यावसायिकांचा समावेश होता.

लॉकडाउनमुळे विविध देशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ आणि भारतीय वायुसेनेने ‘वंदे भारत’ मोहिमेची घोषणा केली होती. गुरुवारी ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ अंतर्गत आयएनएस शार्दुल इराणमधील अब्बास बंदरातून २३३ भारतीयांना घेऊन गुजरातच्या पोरबंदर बंदरावर दाखल झाली.

leave a reply