आसाममध्ये पाच संघटनांच्या हजार अतिरेक्यांची शरणागती

गुवाहाटी – आसाममधील ‘नॅशनल डेमॉक्रेटीक फ्रन्ट ऑफ बोडोलॅण्ड’ (एनडीएफबी) या बंडखोरी संघटनेचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी इन्गाती सोंगब्जीतसह १ हजार ३९ अतिरेक्यांनी शरणागती पत्करली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत या दहशतवाद्यांनी शस्त्रखाली ठेवली. यातील बहुतांश अतिरेकी कार्बी वंशीय असून गेल्या दीड दोन वर्षात शेकडो बोडो अतिरेकी शरण आले आहेत. तसेच ईशान्य भारतातील कित्येक बंडखोरी संघटना शांती चर्चेत सहभागी झाल्या आहेत. शरण आलेल्या अतिरेक्यांनी मुख्य धारेत येण्याचा योग्य मार्ग निवडला आहे, असे आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यावेळी म्हणाले.

बंडखोरी संघटनांनी हिंसा थांबवून आसाम आणि ईशान्य भारताच्या विकासात हातभार लावावा. येथे शांतता प्रस्थापित झाल्यास या भागाचा विकास वेगाने होईल, हे ध्येय ठेवून बंडखोरी संघटनांशी पाच वर्षांपूर्वी शांतीचर्चा सुरू करण्यात आली होती. एकाबाजूला म्यानमारच्या लष्कराच्या मदतीने अतिरेक्यांविरोधात जोरदार कारवाई करताना दुसर्‍या बाजूला विकासकामांनाही गती देण्यात आली. तसेच शरण येणार्‍या अतिरेक्यांना पुनर्वसनाची योजनाही सुरू करण्यात आली. यामुळे गेल्या काही वर्षात ईशान्य भारतात विशेषत: आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर विविध संघटनांचे अतिरेकी आणि त्यांचे नेते शरण आले आहेत. यामध्ये उल्फा अतिरेक्यांचाही समावेश आहे.

बुधवारी शरण आलेल्या अतिरेक्यांमध्ये ‘कर्बी पिपल्स लिब्रेशन टायगर’ (केपीएलटी), ‘पिपल्स डेमॉक्रेटीक काउंसिल ऑफ कर्बी लोंगरी’ (पीडीसीके), ‘कर्बी लोंगरी एनसी हिल्स लिब्रेशन फ्रन्ट’ (केएलएनएलएफ), ‘कुकी लिब्रेशन फ्रन्ट’ (केएलएफ) आणि ‘युनायटेड पिपल्स लिब्रेशन आर्मी’ (युपीएलए) या बंडखोर संघटनेच्या अतिरेक्यांचा समावेश आहे.

‘एनडीएफबी’सारख्या संघटनेत सामील होऊन मोठ्या प्रमाणावर हिंसाचारी कारवाया करणार्‍या २०१४ सालच्या काही मोठ्या अतिरेकी हल्ल्यात हात असलेल्या इन्गाती सोंगब्जीतही शरण आला आहे. सोंगब्जीतने काही वर्षांपूर्वीच ‘एनडीएफबी’ सोडली होती व त्याने ‘पीडीसीके’ ही स्वतंत्र संघटना स्थापन केली होती. सोंगब्जीत २००हून अधिक जणांच्या हत्येला जबाबदार आहे. सहा वर्षांपूर्वी त्याला मोस्ट वॉटेंड म्हणून घोषित करण्यात आले होते. सोंगब्जीत हा म्यानमारमधून हिंसक कारवाया करीत होता. मात्र आता म्यानमारमधून येऊन सोंगब्जीत शरण आला आहे.

शरण आलेल्या दहशतवाद्यांकडून ३३८ शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये ५८ ‘एके-४७’ रायफल, ११ ‘एम१६ रायफल’, आठ हलक्या मशिनगन, यासह ११ हजार २०३ काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

leave a reply