जम्मू-काश्मीरमध्ये ‘हिजबुल’चे आणखी तीन दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षादलांच्या जवानांनी हिजबुल मुजाहिदीनच्या आणखी तीन दहशतवाद्यांना ठार केले. जून महिन्यात आतापर्यन्त शोपियानमधेच ‘हिजबुल’चे १७ दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गेल्या १६ दिवसातच ४१ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले असून यामध्ये ‘हिजबुल’, ‘लश्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ च्या दहशतवाद्यांच्या समावेश आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनागमध्ये सरपंच अजय पंडिता यांच्या हत्येत सहभागी असलेला ‘हिजबुल’चा दहशतवादीही गेल्या आठवड्यात एका कारवाईत ठार झाल्याची माहिती जम्मू- काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

jammu-kashmir-Hizbulशोपियन जिल्ह्यातील तुर्कवानगाम भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ४४ राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि सीआरपीएफची १७८ बटालियनने हे संयुक्त ऑपरेशन हाती घेतले होते. पहाटे पाचच्या सुमारास उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.

चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आली आहे. त्याचे नाव कामरान झहूर मनहास असल्याचे माहिती मिळत आहे. घटनास्थळावरुन इन्सास रायफल आणि दोन एके-४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसात सुरक्षादलाने दहशतवाद्यांविरोधात हाती घेतलेल्या कारवाईत मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. मागील एका आठवड्यात चार मोठ्या चकमकीत उडाल्या आहेत. तर दोन आठवड्यात शोपियन जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या ९ चकमकीत २२ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांमध्ये सहा कमांडर्सचा समावेश आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात केवळ एक दहशतवादी शिल्लक राहिला असल्याची माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली. गेल्याच महिन्यात डोडा जिल्ह्यात ‘हिजबुल’चा दहशतवादी ताहीर अहमद भट याला ठार मारण्यात आले होते. त्यानांतर आता येथील दहशतवादी जवळपास संपुष्टात आले आहेत. डोडा जिल्ह्यात जहांगीर सरूरी उर्फ मोहम्मद अमीन भट हा एकमेव दहशतवादी राहिला असून त्याला पकडण्यासाठी सुरक्षादलाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच्यावर इनामही ठेवण्यात आले आहे. सरूरी कित्येक वर्षांपासून या भागात सक्रिय असल्याचे सिंग म्हणाले.

leave a reply