सिरियातून झालेल्या रॉकेट हल्ल्यात तुर्कीचे तीन जण ठार

रॉकेट हल्ल्यातअंकारा – तुर्कीने चढविलेल्या हवाई हल्ल्यात सिरियातील ३१ जणांचा बळी गेल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटली आहे. सिरियातून तुर्कीत चढविलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये तीन नागरिकांचा बळी गेल्याची माहिती तुर्कीच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी दिली. यावर चिडलेल्या तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी सिरियात लष्करी मोहीम छेडण्याचा नवा इशारा दिला.

गेल्या आठवड्यात इस्तंबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा बळी गेला होता. यासाठी पीकेके तसेच वायपीजी या सिरियातील कुर्द गटाला जबाबदार धरून हवाई हल्ले चढविले होते. यामध्ये ३१ नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप सिरियातील मानवाधिकार संघटनेने केला. यामुळे खवळलेल्या सिरियातील कुर्द गटांनी सोमवारी तुर्कीच्या सीमेजवळील भागावर रॉकेट हल्ले चढविले. यात तिघांचा बळी गेल्यानंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सिरियातील कुर्दांची वस्ती असलेल्या ठिकाणांवर हवाई हल्ल्याबरोबरचे लष्करी मोहीम छेडण्याचे जाहीर केले.

दरम्यान, आठवड्यापूर्वी इस्तंबूल शहरात झालेल्या बॉम्बस्फोटासाठी तुर्कीने कुर्द संघटनांना जबाबदार धरले असले तरी कुर्दांनी तुर्कीचे हे आरोप फेटाळले आहेत. त्यातच या स्फोटाप्रकरणी समोर येणाऱ्या नव्या माहितीमुळे हे ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी तुर्कीवरच संशय व्यक्त केला जात आहे.

leave a reply