बीजिंग/व्हिल्निअस – तैवानशी सहकार्य वाढविणार्या लिथुआनियाला इतिहासाच्या कचर्यात फेकून देऊ अशी धमकी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने दिली आहे. चीनच्या या धमकीला लिथुआनियाच्या संसद सदस्याने प्रत्युत्तर दिले असून, या कचर्यात साम्यवादाचा (कम्युनिझम) आधीच समावेश झाला आहे, असा टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने लिथुआनियाची कोंडी करण्यासाठी युरोपियन कंपन्यांवर दडपण आणण्यास सुरुवात केल्याचे समोर आले होते.
गेल्या काही महिन्यात अमेरिका व युरोपसह आंतरराष्ट्रीय समुदायातील प्रमुख देशांकडून तैवानला वाढते समर्थन तसेच सहकार्य मिळत आहे. यामुळे चीनची कम्युनिस्ट राजवट अस्वस्थ झाली असून विविध मार्गांनी नैराश्य दाखविताना दिसत आहे. गेल्या महिन्यात युरोपमधील जेमतेम २८ लाख लोकसंख्येच्या लिथुआनियामध्ये तैवानच्या राजनैतिक कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. ही बाब चीनच्या पचनी पडली नसून लिथुआनियाची सर्व बाजूंनी कोंडी करण्यासाठी चीन सक्रिय झाला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून लिथुआनियाला सातत्याने धमकावण्यात येत असून नवी धमकीही त्याचाच भाग ठरते. ‘आंतरराष्ट्रीय मूल्ये व न्यायाच्या विरोधात उभे राहणार्या लिथुआनियाचे कधीही भले होणार नाही. तैवानच्या विघटनवादी शक्तींबरोबर हातमिळवणी करणार्या लिथुआनियाची अखेर इतिहासाच्या कचरापेटीत होईल’, अशी धमकी चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी दिली. लिजिअन यांच्या धमकीवर लिथुआनियातून प्रतिक्रिया उमटली आहे. ‘चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने लिथुआनियाला इतिहासाच्या कचर्यात लोटण्याची भाषा करणे हा विरोधाभासच म्हणायला हवा. कारण त्याच कचर्यात साम्यवाद आधीच गेला आहे’, असा टोला तैवानचे संसद सदस्य मॅटास माल्देकिस यांनी लगावला.
सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया नोंदविताना माल्देकिस यांनी ‘स्टँडविथतैवान’ हा हॅशटॅग वापरून लिथुआनिया तैवानची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
लिथुआनियाबरोबरच झेक रिपब्लिक, स्लोवाकिया व फ्रान्ससारखे देशही तैवानबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी पावले उचलत असल्याचे समोर आले आहे.