वॉशिंग्टन – सध्या जगभरात हाहाकार माजविणार्या ‘कोविड-19’ साथीचे मूळ कळले नाही, तर भविष्यात ‘कोविड-26’ आणि ‘कोविड-32’ यासारख्या साथींचा धोका आहे, असा इशारा अमेरिकी संशोधक डॉक्टर पीटर हॉटेझ यांनी दिला आहे. गेल्या दोन दशकात ‘सार्स’ तसेच ‘मर्स’सारख्या साथी येऊन गेल्या असून पुढील साथ रोखायची असेल तर चीनमध्ये जाऊन कोरोना साथीचा संपूर्ण उलगडा करून घेणे महत्त्वाचे ठरते, असेही हॉटेझ यांनी बजावले. तर अमेरिकेचे माजी वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ स्कॉट गॉटिलेब यांनी, कोरोनाव्हायरस वुहान लॅबमधून फैलावला असावा हे दर्शविणारे वाढते पुरावे समोर येत असल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षीच कोरोना साथीचा उगम चीनच्या प्रयोगशाळेतून झाला, असा उघड आरोप केला होता. ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनीही यासंदर्भात वक्तव्ये केली होती. मात्र त्यावेळी अमेरिकेतील माध्यमे, विरोधी पक्ष, युरोपिय देश, आघाडीचे संशोधक, तज्ज्ञ तसेच राजकीय वर्तुळातून त्याला जबरदस्त विरोध झाला होता. पण गेल्या काही महिन्यात ही परिस्थिती बदलली असून, कोरोनाचे मूळ चीनच्या वुहान लॅबमध्येच आहे, असे खात्रीलायक दावे समोर येत आहेत. त्यामुळे अमेरिकेतील संशोधक व राजकीय वर्तुळातूनही ‘वुहान लॅब थिअरी’च्या मुद्यावरून चीनला लक्ष्य करीत आहेत.
टेक्सासमधील हॉस्पिटलमध्ये ‘व्हॅक्सिन डेव्हलपमेंट’ची जबाबदारी सांभाळणार्या डॉ. हॉटेझ यांनी चीनला लक्ष्य करून दिलेला इशारा सार्या जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरतो. या शतकातील पहिली मोठी साथ ‘सार्स’ चीनमधूनच आली होती, याकडे डॉ हॉटेझ यांनी लक्ष वेधले. याचा संदर्भ देऊन ‘कोविड-19’चे मूळ जाणून घेणे आवश्यक असल्याचे डॉ. हॉटेझ यांनी स्पष्ट केले. ‘त्यासाठी आंतरराष्ट्रीय संशोधकांचे पथक किमान सहा महिेने ते एक वर्षासाठी चीनच्या हुबेई प्रांतात पाठवायला हवे. केवळ चीन किंवा अमेरिकेच्या नाही तर जागतिक हितसंबंधांच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची ठरते’, याची जाणीव डॉ. हॉटेझ यांनी यावेळी करून दिली.
अमेरिकेतील ‘फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन’चे माजी आयुक्त असणार्या डॉ. स्कॉट गॉटिलेब यांनीही या प्रकरणी चीनला धारेवर धरले. ‘वुहान लॅबबाबत होणारे आरोप फेटाळून लावतील, असे कोणतेही सबळ पुरावे चीनकडून समोर आलेले नाहीत. कोरोना जंगलातून पसरला असावा, यासंदर्भातील संशोधनातूनही फारसे काही हाती लागलेले नाही. उलट तो प्रयोगशाळेतून बाहेर फैलावला असावा, हे सांगणारी अधिकाधिक खात्रीलायक माहिती समोर येत आहे’, या शब्दात डॉ. स्कॉट गॉटिलेब यांनी चीनला फटकारले.
टेक्सास प्रांतातील रिपब्लिकन पार्टीचे संसद सदस्य मायकल मॅक्कॉल यांनी, कोरोनाच्या उगमाबाबत चीनने केलेली लपवाछपवी हा मानवी इतिहासातील सर्वात वाईट गैरव्यवहार (कव्हर अप) ठरतो, असे टीकास्त्र सोडले आहे. या ‘कव्हर अप’मुळे आतापर्यंत किमान 35 लाख जणांना आपले जीव गमवावे लागले असून, जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, असा ठपकाही मॅक्कॉल यांनी ठेवला.
2019 साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिक संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही प्रसिद्ध केले. कोरोना साथीबाबत बोलणार्या चिनी संशोधकांची बोलती बंद करण्यात आली. अनेक पत्रकारांनाही गायब करण्यात आले होते. काही संशोधकांनी जीवाच्या भीतीने देश सोडून दुसर्या देशात आश्रय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधील ‘वुहान लॅब थिअरी’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने चीनची राजवट अस्वस्थ बनली आहे.
यानंतर चीनने भारतात आढणारा कोरोनाचा प्रकार आपल्या देशातही सापडत असल्याचे सांगून आपला बचाव करण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र कोरोनाची साथ चीननेच पसरविली, हे दाखवून देणारे दावे दरदिवशी समोर येत असल्याने, या आरोपातून मुक्त होणे चीनसाठी अवघड बनत चालले आहे. हा आपल्या विरोधातील राजकारणाचा भाग असल्याचा कांगावा चीनने सुरू केलेला आहे. पण 35 लाखाहून अधिकजणांचा बळी घेणार्या कोरोनाच्या साथीला जबाबदार असलेल्या चीनच्या विरोधात जागतिक पातळीवर तिरस्काराची भावना दाटली असून त्याचा फार मोठा फटका चीनला बसेल, असे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे.