ग्रीसच्या लढाऊ विमानांनी जहाजाला ‘वॉर्निंग’ दिल्याचा तुर्कीचा आरोप

- तणाव पुन्हा चिघळण्याचे संकेत

अंकारा/अथेन्स – गेले काही महिने ग्रीसच्या हद्दीत आपली जहाजे पाठवून चिथावणी देणार्‍या तुर्कीने आता ग्रीसच आपल्याला त्रास देत असल्याचा कांगावा सुरू केला आहे. आपले जहाज ‘एजिअन सी’ सागरी क्षेत्रात तैनात असताना ग्रीसच्या ‘एफ-16’ लढाऊ विमानांनी ‘फ्लेअर्स’चा वापर केल्याचा आरोप तुर्कीकडून करण्यात आला. तुर्कीच्या या आरोपामुळे दोन देशांमधील तणाव नव्याने चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर इंधनाचे साठे असल्याचे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण व अहवालांमधून समोर आले आहे. त्यातील अधिकाधिक क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी तुर्कीने कारवाया सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस तसेच सायप्रसच्या अधिकाराखाली असणार्‍या क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचे दावे तुर्कीकडून करण्यात येत आहेत. आपला दावा भक्कम करण्यासाठी तुर्कीने लिबियाबरोबर सागरी हद्दीबाबत एक करारही केला होता.

गेल्या वर्षी तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी तैनात केले होतेे. त्यानंतर गेल्या काही महिन्यात तुर्कीने इंधनाच्या सर्वेक्षणासाठी सातत्याने आपली जहाजे ग्रीसच्या सागरी हद्दीजवळ पाठवून चिथावणी देण्याचा प्रयत्न केला होता. याच काळात आपले वर्चस्व दाखविण्यासाठी तुर्कीने या भागात सातत्याने युद्धसरावही केले होते. त्यामुळे भूमध्य सागरी क्षेत्रातील हद्दीचा वाद ऐरणीवर आला असून बहुसंख्य देशांनी ग्रीसला पाठिंबा दिला आहे. ग्रीसने तुर्कीच्या कारवायांविरोधात वारंवार नाराजी व्यक्त केली असून याप्रकरणी नाटो व युरोपिय महासंघासह इतर व्यासपीठांवर आक्रमकपणे आपली बाजू मांडली आहे. त्याचवेळी तुर्कीला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी आपली संरक्षणसज्जता वाढविण्याचा निर्णयही घेतला आहे. तुर्कीशी चर्चेची तयारी दर्शवून आपली भूमिका चिथावणीखोर नसल्याचेही ग्रीसने दाखवून दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर तुर्कीने अचानक ग्रीसविरोधात केलेला कांगावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

तुर्कीने केलेल्या आरोपांनुसार, ग्रीसच्या चार ‘एफ-16’ लढाऊ विमानांनी एजिअन सीमधील ‘लेमोनेस’ बेटानजिक तैनात असणार्‍या ‘टीसीजी सेस्मे’च्या जवळून उड्डाण केले. उड्डाण करताना ग्रीसच्या लढाऊ विमानांनी क्षेपणास्त्रांना चकवा देण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ‘फ्लेअर्स’चा वापर केल्याचा दावाही तुर्कीने केला आहे. ही जाणूनबुजून त्रास देण्याची कृती असून तुर्कीने त्याला प्रत्युत्तर दिल्याचे संरक्षणमंत्री हुलुसी अकार यांनी सांगितले. ग्रीसच्या संरक्षण विभागाने तुर्कीचे हे दावे फेटाळून लावले आहेत. ग्रीसची लढाऊ विमाने सध्या त्या क्षेत्रात सक्रिय नसल्याचा खुलासाही ग्रीसकडून करण्यात आला आहे.

यापूर्वीच्या काळात तुर्कीची जहाजे, युद्धनौका व विमाने ग्रीसच्या हद्दीत घुसखोरी करीत असल्याच्या घटना वारंवार समोर आल्या होत्या. मात्र आता अचानक तुर्कीकडून उलटा कांगावा सुरू होणे आश्‍चर्यजनक मानले जाते. तुर्कीची ही कृती यापूर्वी केलेल्या चिथावणीखोर व आक्रमक कारवायांमुळे होणार्‍या कारवाईपासून बचावाचा भाग असू शकतो, असा दावा काही विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. मात्र यामुळे तणाव अधिक चिघळण्याचेही संकेत देण्यात येत आहेत.

leave a reply