अंकारा – इस्तंबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी कुर्द गटांना जबाबदार धरल्यानंतर तुर्कीने इराक व सिरियातील कुर्दांविरोधात लष्करी मोहीम छेडण्याची घोषणा केली. तुर्कीने केलेल्या या लष्करी कारवाईच्या घोषणेनंतर मंगळवारी रात्री इस्तंबूल शहर पुन्हा स्फोटाने हादरले. यानंतर लागलेल्या आगीत तीन मोटारी नष्ट झाल्या आहेत.
इस्तंबूल शहरात तीन दिवसात दुसऱ्यांदा स्फोट झाला. येथील फतिह भागात झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या मोटारींनी पेट घेतला. यात ग्रीक महिला पर्यटक किरकोळ जखमी झाल्याचा दावा केला जातो. तुर्कीच्या यंत्रणेने या स्फोटासाठी कुणालाही जबाबदार धरलेले नाही. तसेच रविवारप्रमाणे हा स्फोट घातपाताचा प्रकार असल्याचा आरोपही केलेला नाही. मात्र रविवारी इस्तंबूल शहरात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात जोरदार लष्करी कारवाई छेडण्यात येईल, असे एर्दोगन सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन आणि अंतर्गत सुरक्षामंत्री सुलेमान सोयलू यांनी रविवारच्या स्फोटासाठी ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके’ व सिरियातील संलग्न कुर्द संघटनांना जबाबदार धरले होते. पीकेके तसेच सिरियातील वायपीजी व इतर कुर्द टोळ्यांनी तुर्कीचे आरोप फेटाळले आहेत. त्याचा प्रभाव तुर्कीवर पडलेला नाही. उलट इराक व सिरियातील कुर्दांच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्याचा इशारा तुर्कीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला.
सिरियातील कुर्दवंशिय तुर्कीच्या सुरक्षेसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे तुर्कीने म्हटले आहे. सिरियातील आफ्रिन, कोबानी ही ठिकाणे तुर्कीच्या निशाण्यावर असतील, असा दावा केला जातो. इस्तंबूल शहरातील स्फोटाप्रकरणी अटक केलेली महिला सिरियाच्या कोबानी शहरातील होती, असे तुर्कीच्या यंत्रणांनी जाहीर केले आहे.
पण सिरिया किंवा इराकमधील कुर्दांवर हल्ले चढवून तुर्कीच्या सुरक्षेचा प्रश्न सुटणार नसल्याचे आखातातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. याउलट तुर्कीच्या हल्ल्यांमुळे कुर्दांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन हा संघर्ष अधिकच भडकू शकतो, याकडे हे विश्लेषक लक्ष वेधत आहेत. सिरिया म्हणजे तुर्कीसाठी दलदल ठरेल. सिरियातील लष्करी मोहिमेत तुर्कीला यश मिळेल. मात्र यानंतर तुर्कीत एकट्याने वावरणारे काहीजण घातपात घडवतील आणि हे हल्ले रोखणे तुर्कीला जड जाईल, असा इशारा आखाती विश्लेषक देत आहेत. याबरोबरच तुर्कीच्या सीमेवरील घुसखोरीचा प्रश्नही यामुळे अधिक गंभीर बनेल, असा दावा विश्लेषक करीत आहेत. पण या इशाऱ्यांचा तुर्कीवर विशेष परिणाम होण्याची शक्यता नाही.
सिरियातील कुर्दांवर कारवाईसाठी तुर्की आक्रमक लष्करी मोहीम राबवित आहे. त्यासाठी तुर्की आपल्या देशाच्या सुरक्षेचे कारण पुढे करीत आहे. पण प्र्रत्यक्षात तुर्कीला कुर्दवंशियांचे बाहुल्य असलेला सिरियाचा इंधनसंपन्न भूभाग बळकवायचा आहे. त्यासाठीच तुर्की सिरियातील कुर्दांवर हल्ले चढवित असल्याचे आरोप झाले होते. अशा परिस्थितीत इस्तंबूलमध्ये झालेल्या स्फोटामुळे तुर्कीला सिरियातील कुर्दांवर लष्करी कारवाई करण्याची आणखी एक संधी मिळाल्याचे दिसत आहे.