अंकारा – इस्तंबूल व इतर शहरांमधील इस्रायली नागरिकांवर हल्ले चढविण्याचा मोठा कट तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळला. याप्रकरणी पाच इराणी नागरिकांना ताब्यात घेतल्याचे तुर्कीने म्हटले आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री तुर्कीच्या दौऱ्यावर येण्याआधी ही कारवाई करण्यात आली. इस्रायलने तुर्कीच्या या कारवाईचे स्वागत केले. तर इराणने तुर्की व इस्रायलचे आरोप फेटाळले आहेत.
दुसऱ्या देशांमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इस्रायली नागरिकांवर हल्ले चढविण्याचा इराणने मोठा कट आखल्याचा आरोप इस्रायलने केला होता. यानंतर युएई, बाहरिनसह आखाती देशांमधील इस्रायली नागरिकांना सावध राहण्याची सूचना इस्रायलने दिली होती. तर तुर्कीत गेलेल्या आपल्या नागरिकांना इस्रायलने ताबडतोब मायदेशी परतण्याचे आदेश दिले होते. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी इस्रायली नागरिकांवरील हल्ल्याची फार मोठी किंमत इराणला चुकती करावी लागेल, असे बजावले होते.
तुर्कीने याआधी इस्रायली उद्योजकावरील हल्ल्याचा कट उधळला होता. बुधवारीही तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणांनी इस्तंबूल शहरातील तीन घरे आणि एका हॉटेलवर छापे मारले. यामध्ये पाच इराणी नागरिकांना ताब्यात घेतल्याचे तुर्कीच्या यंत्रणांनी सांगितले. त्यांच्याकडून दोन पिस्तूले हस्तगत केल्याचे तुर्कीने म्हटले आहे.
इस्रायलचे माजी राजनैतिक अधिकारी व त्यांचे कुटुंबिय हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते. या कारवाईनंतर पुढच्या काही तासात इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी तुर्कीला भेट दिली. इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांची भेट घेऊन इराणचा कट उधळल्याबद्दल आभार व्यक्त केले. इराणला कशाप्रकारे उत्तर द्यायचे, हे तुर्कीला बरोबर ठाऊक आहे, अशी प्रशंसा इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी केली.
इराणने मात्र तुर्की व इस्रायलचे आरोप हास्यास्पद असल्याचे सांगून यात अजिबात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच तुर्कीतील तथाकथित कटामध्ये आपला कुठल्याही प्रकारे संबंध नसल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. तर तुर्की इस्रायलच्या इशाऱ्यावरून इराणच्या विरोधात गेला आहे, अशी टीका इराणच्या माध्यमांनी केली आहे.
दरम्यान, इराणविरोधातील कारवाईनंतर इस्रायल व तुर्कीने राजनैतिक स्तरावरील सहकार्य नव्यान प्रस्थापित करणार असल्याची घोषणा केली. यानुसार लवकरच उभय देशांमधील राजनैतिक सहकार्य पुन्हा सुरू होईल, अशी माहिती तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले. 2010 साली तुर्कीने इस्रायलमधील आपल्या राजदूताला माघारी बोलावले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले होते. पण आर्थिक संकटात सापडल्यामुळे तुर्कीने आपल्या परराष्ट्र धोरणात फेरबदल करून इस्रायलसह अरब देशांबरोबर नव्याने सहकार्य सुरू करण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. त्याच प्रमाणात तुर्कीचे इराणबरोबरील संबंध बिघडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.