इस्तंबूल – इस्रायलबरोबरचा तणाव बाजूला ठेवून नव्याने राजनैतिक सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी तुर्की तयार असल्याची घोषणा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी केली. पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत तुर्की-इस्रायल सहकार्य रुळावर येतील, असा दावा एर्दोगन यांच्या सल्लागारांनी काही तासांपूर्वीच केला होता. अमेरिका आणि युरोपिय महासंघाच्या निर्बंधांमुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडल्यामुळे तुर्कीने इस्रायलबरोबर जुळवून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचा दावा केला जातो. तर तुर्कीने सुरू केलेल्या या हालचालींचा सर्वात मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे.
२०१० साली तुर्कीने मानवतावादी सहाय्याने भरलेली सहा जहाजे गाझापट्टीसाठी रवाना केल्या होत्या. यापैकी ‘मावी मारमारा’ या सर्वात मोठ्या जहाजावर इस्रायलने कारवाई केली होती. या कारवाईत तुर्कीच्या नऊ नागरिकांचा बळी गेल्यानंतर तुर्की व इस्रायलमधील संबंधात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. तर गेल्या वर्षी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी घोषित केल्यानंतर तुर्कीने यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर तुर्की व इस्रायलने आपले राजदूत माघारी बोलाविले होते. यानंतरच्या काळात तुर्कीने इस्रायलच्या विरोधात जहाल भूमिका स्वीकारली होती. इस्रायल पॅलेस्टाईनवर अत्याचार करीत राहणार असेल, तर तुर्कीसह सर्वच इस्लामी देश इस्रायलवर तुटून पडतील, अशी धमकी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी दिली होती. काही आठवड्यांपूर्वी युएईने इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर, तुर्कीने युएईवर सडकून टीका करून युएईबरोबरील राजनैतिक संबंध तोडण्याचा इशारा दिला होता.
पण आता मात्र तुर्कीने इस्रायलबाबत नरमाईची भूूमिका स्वीकारल्याचे दिसत आहे. आठवड्याभरापूर्वी तुर्कीने इस्रायलसाठी राजदूत नेमण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी इस्रायलमधील राजदूत पदासाठी उफूक युलूतास यांच्या नावाची घोषणा करून इस्रायलबरोबर संबंध सुधारण्यासाठी तुर्की उत्सुक असल्याचे संकेत दिले होते. तर शुक्रवारी एर्दोगन यांनी इस्रायलच्या नेतृत्वाबरोबर चर्चा करुन संबंध पूर्ववत होऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे परराष्ट्र धोरणांवरील सल्लागार मेसूत कॅसिन यांनी उघडपणे मार्च महिन्यापर्यंत उभय देशातील संबंध सुरळीत होतील, असा दावा केला आहे. ‘इस्रायलने एक पाऊल पुढे घेतले तर तुर्की दोन पावले पुढे येईल. तुर्की इस्रायलमधील आपले दूतावास पुन्हा सुरू करील’, असे कॅसिन यांनी म्हटले होते.
दहा दिवसांपूर्वी तुर्कीने राजदूतासंबंधी केलेली घोषणा आणि आता राजनैतिक सहकार्याबाबत केलेला दावा, यावर इस्रायलने प्रतिक्रिया दिलेली नाही. तुर्की आणि इस्रायलमध्ये नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी अझरबैजानने मध्यस्थीची तयारी दाखविली आहे. अझरबैजानचे परराष्ट्रमंत्री जेहून बायरामोव्ह यांनी काही दिवसांपूर्वी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी एश्केनॉत यांच्याशी यासंबंधी फोनवरुन चर्चा केल्याचे बोलले जाते. तर एर्दोगन यांच्या भूमिकेत झालेल्या या बदलाकडे इस्रायल अतिशय सावधपणे पाहत असल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिका व युरोपिय महासंघाने तुर्कीवर निर्बंधांची घोषणा केली. या निर्बंधाचा थेट परिणाम तुर्कीच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. तर स्वतंत्र इस्लामी देशांची संघटना उभारण्याचे स्वप्न पाहणारा तुर्की सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांकडून आधीच दुरावलेला आहे. तर सिरियात तुर्कीच्या लष्कराची घुसखोरी, लिबियातील हस्तक्षेप, अझरबैजान-आर्मेनिया संघर्ष, ग्रीस-सायप्रसबरोबरचा वाद यामुळेही आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्की एकटा पडत चालला आहे.
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाबरोबर एर्दोगन यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. पण आगामी ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाकडून तुर्कीवर कडक कारवाईची दाट शक्यता असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तुर्कीची खालावलेली अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोंडी आणि अमेरिकेतील सत्ताबदल यामुळे तुर्कीतील एर्दोगन यांचे सरकार कमालीचे अस्वस्थ झाले आहे. या पार्श्वभूमीवर, एर्दोगन यांनी इस्रायलशी जुळवून अमेरिकेची मर्जी राखण्यासाठी हालचाली सुरू केल्याचा दावा केला जातो.
दरम्यान, तुर्कीच्या या बदलेल्या भूमिकेचा पाकिस्तानला जबर धक्का बसला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तुर्कीने पाकिस्तानवरील प्रभाव वाढविला होता. तुर्कीबरोबरील पाकिस्तानचे वाढत्या संबंधांमुळे नाराज झालेल्या सौदी व युएईने पाकिस्तानला वठणीवर आणणारी पावले उचलली होती. पण आता तुर्कीच इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याची तयारी करीत असताना,
याचे धक्के पाकिस्तानला बसू लाग कोंडीत सापडलेला तुर्की इस्रायलशी संबंध सुधारण्यास तयार