इस्रायलने सहकार्य केले तरीही तुर्की हमासला पाठिंबा देईल

- इटलीच्या विश्‍लेषकांचा इशारा

हमासला पाठिंबाअंकारा/जेरूसलेम – इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष लवकरच तुर्कीमध्ये दाखल होत असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी घोषणा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी केली. जवळपास बारा वर्षांच्या तणावानंतर इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांची ही भेट दोन्ही देशांच्या संबंधासाठी उपकारक ठरेल, असा दावा तुर्कीची माध्यमे करीत आहेत. तरीही आर्थिक लाभासाठी इस्रायलशी सहकार्य करणारा तुर्की इस्रायलद्वेष्ट्या हमास व इतर दहशतवादी संघटनांबरोबर असलेले सहकार्य मोडणार नाही, असा इशारा इटलीच्या विश्‍लेषकांनी दिला.

काही दिवसांपूर्वी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग यांच्या तुर्की भेटीची माहिती दिली. फेब्रुवारी महिन्यामध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष तुर्कीत दाखल होतील. याद्वारे तुर्की इस्रायलकडून आर्थिक गुंतवणूक मिळवून नैसर्गिक इंधनवायूचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करील. आर्थिक संकटात सापडलेल्या तुर्कीसाठी इस्रायलबरोबरचे हे सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरते. यासाठीच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष इस्रायलशी नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव देत आहेत.

याआधी २०१० सालापर्यंत इस्रायल आणि तुर्कीमध्ये राजनैतिक, व्यापारी व आर्थिक सहकार्य होते. पण बारा वर्षांपूर्वी तुर्कीने हमासच्या नियंत्रणाखाली असलेल्या गाझापट्टीसाठी मदत घेऊन जहाज रवाना केले होते. इस्रायली लष्कराने या जहाजावर केलेल्या कारवाईत १० जण ठार झाले होते. यानंतर तुर्कीने इस्रायलबरोबरचे सहकार्य तोडून आपला राजदूत माघारी बोलाविला होता. तसेच इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा देणार्‍या हमास व इतर दहशतवादी संघटनांचे उघडपणे समर्थन सुरू केले होते. एकेकाळी ऑटोमन साम्राज्याचा भूभाग असलेला पूर्व जेरूसलेमवर तुर्कीचा अधिकार असल्याचा दावाही एर्दोगन यांनी ठोकला होता.

पण गेल्या वर्षभरात परिस्थिती बदलली आहे. तुर्कीवरील आर्थिक संकटामुळे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आपली सत्ता वाचविण्यासाठी, एर्दोगन यांना इस्रायलकडून आर्थिक गुंतवणूक हवी आहे, असे इटालियन विश्‍लेषक सर्जिओ रेसेई यांनी इस्रायली वृत्तसंस्थेसाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

इस्रायलबरोबर सहकार्य सुरळीत करण्याच्या तयारीत असलेल्या तुर्कीने सर्वात आधी इस्रायलच्या मागण्या मान्य कराव्या, अशी अट ‘शिन बेत’ या इस्रायली गुप्तचर यंत्रणेने ठेवली. तुर्कीने हमास व इतर इस्रायलद्वेष्ट्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया नियंत्रित कराव्या, अशी अट इस्रायली गुप्तचर यंत्रणेने ठेवल्याची माहिती विश्‍लेषक रेसेई यांनी दिली. तुर्की अशा दुटप्पी भूमिकांसाठी आणि दहशतवाद्यांच्या समर्थनासाठी कुख्यात असल्याचे रेसेई यांनी लक्षात आणून दिले. भारताच्या जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना एर्दोगन यांच्या कुटुंबियांशी संलग्न संघटनांकडून पैसा पुरविला गेला होता. भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी हे नेटवर्क जगासमोर आणले होते, याकडे इटालियन विश्‍लेषक रेसेई यांनी लक्ष वेधले. तुर्की आणि पाकिस्तान यांच्यात अजिबात फरक नसल्याचा दावा रेसेई यांनी केला.

या दोन्ही देशांच्या नेतृत्वाला इस्लामी जगाचे नेतृत्व करायचे आहे, दोन्ही देश दहशतवादाचे समर्थक आहेत, तसेच त्यांच्या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, हे रेसेई यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक असलेला तुर्की हमास व इतर दहशतवादी संघटनांचे समर्थन सोडून देणार नाही, असा दावा रेसेई यांनी केला. अशा तुर्कीबरोबर सहकार्य प्रस्थापित करणे इस्रायलसाठी धोक्याचे ठरेल, असा इशारा रेसेई यांनी दिला.

दरम्यान, तुर्कीने इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याची तयारी दाखविल्यामुळे पाकिस्तानला हादरा बसला आहे. पाकिस्तानचे नेते आणि जनतेने ज्यांच्यावर सौदी अरेबिया आणि इतर अरब देशांपेक्षाही जास्त विश्‍वास ठेवला होता, त्या तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी हालचाली सुरू करून पाकिस्तानला एकटे पाडल्याची टीका पाकिस्तानी माध्यमांमधून होत आहे.

leave a reply