एजियन बेटांच्या मुद्यावरुन तुर्कीचा ग्रीसला इशारा

- तुर्कीने अमेरिकेच्या विरोधात निषेध नोंदविला

एजियनअंकारा – ‘तुर्कीचे अधिकार आणि हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी तुर्की पूर्णपणे तयार आहे. ग्रीसला उत्तर देताना सर्व ताकदीचा वापर केला जाईल’, असा इशारा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी दिला. काही तासांपूर्वीच ग्रीसने एजियन बेटांचे बेकायदेशीररित्या लष्करीकरण करून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप तुर्कीने केला होता. तसेच ग्रीसच्या राजदूताला समन्स बजावले होते. ग्रीसने या बेटांवर अमेरिकेची लष्करी वाहने तैनात केल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून तुर्कीने अमेरिकेचाही निषेध केला आहे.

ग्रीस आणि तुर्कीमधील एजियन सागरी क्षेत्र या दोन्ही देशांमधील वादाचे आणखी एक कारण आहे. तुर्कीच्या विनाशिका आणि गस्तीनौका ग्रीसच्या सागरी क्षेत्रात गस्त घालत आहेत. याद्वारे तुर्की ग्रीसच्या सार्वभौम सागरी क्षेत्राचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रीसने याआधी केला होता. तुर्कीच्या विनाशिकांच्या आक्रमकतेचा मुद्दा ग्रीसने युरोपिय महासंघ तसेच संयुक्त राष्ट्रसंघातही उपस्थित केला होता.

तर तुर्कीने ग्रीसवर एजियन समुद्राचे लष्करीकरण सुरू केल्याचा ठपका ठेवला होता. ग्रीसच्या लढाऊ विमानांनी तुर्कीच्या हवाईहद्दीतून धोकादायक उड्डाण केल्याची टीका तुर्कीने काही दिवसांपूर्वीच केली होती. तर दोन दिवसांपूर्वी तुर्कीच्या लष्कराने ड्रोन फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून ग्रीसने एजियन बेटांवर लष्करी जमवाजमव केल्याचा नवा आरोप केला. गेल्या आठवड्यातच ग्रीसच्या लष्कराने एजियन बेटांवर नवी तैनाती केल्याचे तुर्कीच्या लष्कराचे म्हणणे आहे.

येथील अलेक्झांड्रोपोलीस बेटावर लष्करी वाहने तर मिदिली बेटावर 23 व सिसाम बेटावर 18 चिलखती वाहने तैनात केल्याचा दावा तुर्कीच्या लष्कराने केला. अमेरिकेने भेट म्हणून दिलेली लष्करी वाहने ग्रीसने या बेटांवर तैनात केल्याची टीका तुर्कीचे लष्कराने केली. ग्रीसची ही कारवाई आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे सांगून तुर्कीने संयुक्त राष्ट्रसंघाकडे कारवाईचे आवाहन केले होते. पण तुकीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी अधिक आक्रमक भूमिका स्वीकारून ग्रीसला इशारा दिला. आपल्या देशाचे अधिकार आणि हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी तुर्की सर्व ताकदीचा वापर करणार असल्याचे एर्दोगन यांनी धमकावले. ‘ग्रीसची धोरणे प्रक्षोभक असून एजियन समुद्रातील लष्करी हालचाली ग्रीसला दलदलीत ओढणारी आहेत. ग्रीस, ग्रीसचे नेते आणि या देशाची जनता यांच्यासाठी सदर लष्करीकरण धोकादायक ठरतील’, असे एर्दोगन यांनी बजावले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’चे सदस्यत्व मिळविण्यासाठी तुर्कीने प्रयत्न सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. उझबेकिस्तानच्या समरकंद येथे पार पडलेल्या बैठकीत तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी यासंबंधी रशिया व चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केल्याचे युरोपिय पत्रकारांचे म्हणणे होते. एससीओमध्ये सामील होण्यासाठी उत्सूक असलेला तुर्की नाटोपासून फारकत घेत असल्याचा आरोप युरोपिय पत्रकार करीत आहेत.

leave a reply