‘युरोएशिया पॉवर केबल’च्या मुद्यावरून तुर्कीचा इस्रायल, ग्रीस व सायप्रसला इशारा

अंकारा/जेरुसलेम/अथेन्स – आशिया व युरोपमध्ये उभारण्यात येणार्‍या ‘अंडरसी पॉवर केबल’ प्रकल्पावरून तुर्कीने इस्रायलसह ग्रीस व सायप्रसला इशारा दिला आहे. या तिन्ही देशांनी प्रकल्पाची उभारणी करताना तुर्कीची परवानगी घ्यावी, अशी मागणी करणारी ‘डिप्लोमॅटिक नोट’ तुर्कीने पाठविल्याचा दावा तुर्कीच्या माध्यमांनी केला आहे. गेल्याच आठवड्यात इस्रायल, ग्रीस व सायप्रसने ‘युरोएशिया इंटरकनेक्टर’ प्रकल्पाच्या परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या.

इस्रायल, सायप्रस व ग्रीसच्या ‘पॉवर ग्रिड्स’ला जोडणार्‍या ‘अंडरसी पॉवर केबल’चा प्रस्ताव २०१७ साली समोर आला होता. त्यानंतर गेली तीन वर्षे विविध स्तरावर झालेल्या चर्चानंतर गेल्या आठवड्यात या प्रकल्पाच्या परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. सायप्रसची राजधानी निकोसियामध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी इस्रायल व सायप्रसचे ऊर्जामंत्री उपस्थित होते. ग्रीसच्या ऊर्जामंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला.

‘द युरोएशिया इंटरकनेक्टर प्रोजेक्ट’ असे नाव असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत १२०० किलोमीटर्सहून अधिक लांबीची ‘अंडरसी पॉवर केबल’ टाकण्यात येणार आहे. इस्रायल, सायप्रस व ग्रीसदरम्यान दोन हजार मेगावॅट क्षमतेचा ‘इलेक्टिसिटी हायवे’ उभारला जाईल, असे करारात नमूद करण्यात आले. प्रकल्पासाठी अडीच अब्ज युरो खर्च येणार असून २०२५ सालापर्यंत प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यरत होईल, असे सांगण्यात येते. हा करार इस्रायल, सायप्रस व ग्रीसमधील वाढत्या सहकार्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

गेल्या वर्षी इस्रायलने ग्रीस व सायप्रस या देशांसह युरोपबरोबर ‘ईस्टमेड पाईपलाईन’ या महत्त्वाकांक्षी इंधनप्रकल्पावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर इस्रायल व ग्रीसदरम्यान संरक्षणकरारावरही स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. इस्रायलने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘नोबल दिना’ नौदल सरावात ग्रीस व सायप्रसने सहभाग घेतला होता. ग्रीस व सायप्रसबरोबरील हे वाढते सहकार्य तुर्कीच्या वाढत्या हालचालींना शह देण्याच्या योजनेचा भाग मानला जातो.

या पार्श्‍वभूमीवर तुर्कीने नव्या करारावरून तिन्ही देशांना दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. तुर्की सरकारने तिन्ही देशांच्या दूतावासांना ‘डिप्लोमॅटिक नोट’ पाठविल्याची माहिती तुर्की माध्यमांनी दिली. या नोटमध्ये तुर्कीने ‘अंडरसी पॉवर केबल’च्या प्रकल्पाबाबत झालेल्या कराराला विरोध दर्शविला आहे. सदर प्रकल्प आपल्या सागरी क्षेत्राच्या हद्दीतून जात असल्याचा दावा तुर्कीने केला आहे. हा दावा करतानाच इस्रायल, ग्रीस व सायप्रस या तिन्ही देशांनी प्रकल्पासंदर्भात पुढील पाऊल उचलताना तुर्कीची परवानगी घ्यावी, अशी आक्रमक मागणीही केली आहे.

तुर्कीची ही मागणी गेल्या काही वर्षात राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्याकडून राबविण्यात येणार्‍या महत्त्वाकांक्षी धोरणाचे संकेत दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तुर्कीकडून आखात तसेच भूमध्य सागरी क्षेत्रात आक्रमक हालचाली सुरू आहेत. गेल्या वर्षी तुर्कीने ग्रीसच्या हद्दीतील बेटांवर आपला हक्क असल्याचा दावा करून इंधनक्षेत्रात संशोधन करण्यासाठी जहाजे व युद्धनौका पाठविल्या होत्या. भूमध्य सागरातील ग्रीसच्या काही भागांवर तुर्कीने आपला दावा ठोकला आहे.
‘द युरोएशिया इंटरकनेक्टर प्रोजेक्ट’वरून तुर्कीने तीन देशांना दिलेला इशारा हा दावा भक्कम करण्याचे प्रयत्न असू शकतात, असे सांगण्यात येते.

leave a reply