अॅमस्टरडॅम – नेदरलॅण्डस्मध्ये कट्टरवादाचा प्रभाव वाढत असून त्यामागे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांचा हात असल्याचा आरोप नेदरलॅण्डस्च्या सुरक्षायंत्रणेकडून करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन जाणीवपूर्वक नेदरलॅण्डस्च्या (हॉलंड/डच) तुर्कीवंशियांमध्ये विद्वेषाला खतपाणी घालण्याचा कट आखल्याचा ठपका डच सुरक्षायंत्रणेने ठेवला आहे. हा अहवाल समोर येत असतानाच नेदरलॅण्डस्मधील संसद सदस्य गीर्ट विल्डर्स यांनी एर्दोगन यांचा ‘टेररिस्ट’ असा उल्लेख असणारे ट्विट प्रसिद्ध केले असून, त्याविरोधात तुर्कीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
नेदरलॅण्डस्च्या ‘न्याय व सुरक्षा मंत्रालया’च्या अखत्यारित येणार्या ‘नॅशनल कोऑर्डिनेटर फॉर सिक्युरिटी अॅण्ड काऊंटरटेररिझम’ने देशातील वाढत्या कट्टरवादासंदर्भात अहवाल तयार केला आहे. हा अहवाल अद्याप उघड करण्यात आला नसला तरी एका डच मासिकाने त्याची माहिती मिळाल्याचा दावा केला आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन नेदरलॅण्डस्मध्ये कट्टरतावाद व धार्मिक विद्वेषाचा प्रसार करणार्या ‘तुर्की-डच’ गटांना प्रोत्साहन देत असल्याचे आढळल्याचा दावा या मासिकाने केला आहे.
दोन वर्षांपूर्वी नेदरलॅण्डस्मध्ये झालेला दहशतवादी हल्ला व एर्दोगन यांच्या कट्टरतावादी वक्तव्यांचा संबंध असल्याचा दावाही डच यंत्रणेकडून करण्यात आला. ‘उट्रेक्ट’मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर तानिस नावाचा तुर्कीवंशिय होता, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. नेदरलॅण्डस्मधील तुर्की समाजावर तुर्कीतील सत्ताधारी राजवटीचा जबरदस्त प्रभाव असून, दुहेरी नागरिकत्व असणारे अनेक ‘तुर्की-डच’ नागरिक एर्दोगन यांना मतदान करीत असल्याचेही समोर आले आहे. या नागरिकांचे एर्दोगन राजवटीने स्थापन केलेल्या अनेक गटांशी संबंधही उघड झाले आहेत. नेदरलॅण्डस् सध्या जवळपास चार लाख ‘तुर्की-डच’ नागरिकांचे वास्तव्य आहे.
दरम्यान, आक्रमक उजव्या विचारसरणीचे डच संसद सदस्य गीर्ट विल्डर्स यांनी, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे छायाचित्र ट्विट करून ‘टेररिस्ट’ असा उल्लेख केला आहे. नेदरलॅण्डस्मधील ‘फ्रीडम पार्टी’चे प्रमुख असणार्या विल्डर्स यांनी, तुर्की राजदूतांच्या हकालपट्टीचीही मागणी केली आहे. विल्डर्स यांच्या या ट्विटमुळे तुर्की बिथरला असून एर्दोगन राजवटीने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र नेदरलॅण्डस्चे पंतप्रधान मार्क रुट यांनी तुर्कीच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडले असून, तुर्कीचा निर्णय अस्वीकारार्ह असल्याचे बजावले आहे.
नेदरलॅण्डस् व तुर्कीमधील संबंधांमध्ये 2017 सालापासून तणाव असून रुट यांच्या भूमिकेमुळे तो अधिकच चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत. 2017 साली डच सरकारने एर्दोगन राजवटीच्या दोन मंत्र्यांना नेदरलॅण्डस्मध्ये प्रवेश नाकारला होता. सदर मंत्र्यांना नेदरलॅण्डस्मधील तुर्कीवंशियांमध्ये एर्दोगन यांचा प्रचार करायचा होता. त्यानंतर गेल्या वर्षी फ्रान्स व तुर्कीमध्ये झालेल्या वादात डच सरकारने फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना समर्थन दिले होते.