नवी दिल्ली – देशातील १८ राज्यांमध्ये ‘डबल म्युटंट’ कोरोनाव्हायरस सापडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली. मात्र सध्या देशात वाढत असलेल्या रुग्ण संख्येमागे हा दुहेरी बदल झालेला कोरोनाव्हायरस आहे का? तसेच कोरोना विषाणूचा हा नवा प्रकार नक्की किती धोकादायक आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या दोन नव्या स्ट्रेनचे अस्तित्त्व आढळून आले आहे. महाराष्ट्रात आढळलेले हे दोन्ही स्ट्रेन जास्त वेगाने पसरणारे आहेत, असेही संशोधनात लक्षात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
देेशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मंगळवापासून बुधवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात ४७ हजाराहून नवे रुग्ण आढळले आहेत. २७५ जण दगावले. चोवीस तासात आढळलेली ही रुग्णसंख्या गेल्या १३२ दिवसातील एका दिवसात आढळलेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तसेच ८३ दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद चोवीस तासात झाली आहे. कोरोना रुग्णांबाबतची ही आकडेवारी चिंता वाढवित असताना देशात कोरोना विषाणूमध्ये म्यूटेशन होत आहे. देशात आतापर्यंत निरनिराळे म्युटंट कोरोना विषाणू आढळले आहेत. आता दुहेरी म्युटंट कोरोना विषाणूही आढळला आहे.
विषाणूंच्या रचनांमध्ये कालांतराने बदल होत असतात. यातून या विषाणूचे नवे स्ट्रेन म्हणजे प्रकार जन्माला येतात. विविध प्रकारच्या विषाणूंमध्ये ठराविक काळात असे बदल पाहायला मिळाले आहेत. विषाणूमध्ये बदल होऊन निर्माण झालेले सर्वच नवे स्ट्रेन धोकादायक नसतात. मात्र काही स्ट्रेन धोकादायक असू शकतात. जिनोम सिक्वेन्स तपासून नव्या स्ट्रेन शोध लावला जातो. कोरोनाच्या विषाणूच्या बाबतीतही असे बदल जगाभरात दिसत आहेत आणि यातून कोरोनाचे नवे स्ट्रेन जन्माला आले आहेत. देशातही आतापर्यंत कितीतरी नवे स्ट्रेन आढळले आहेत. मात्र ते धोकादायक ठरलेले नाहीत. आता एकाच वेळी दुहेरी बदल अर्थात डबल म्युटंट झालेला कोरोना विषाणू आढळला आहे.
देशभरातील विविध राज्यातून १०,७८७ नमुने जिनोम सिक्वेन्स तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये हा डबल म्युटंट कोरोना विषाणू आढळून आला. १८ राज्यांमध्ये हा डबल म्युटंट विषाणू आढळला आहे. मात्र नमुन्यांमध्ये त्याची संख्या खूपच कमी आहे. तसेच तो घातक असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
याशिवाय महाराष्ट्रात ‘ई४८४क्यू’, ‘एल४५२आर’ ही कोरोनाची दोन म्युटेशन आढळून आल्याचे जिनोम सिक्वेन्ससाठी पाठविलेल्या नमुन्यावरून लक्षात आले आहे. महाराष्ट्रातून गेलेले १५ ते २० टक्के नमुने हे याआधी महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोना स्ट्रेनपेक्षा वेगळे असल्याचे असल्याचे जिनोम सिक्वेन्स तपासताना लक्षात आले. त्यानंतर हे दोन नवे म्युटेशन असल्याचे स्पष्ट झाले.
कोरानाव्हायरसची ही दोन्ही म्युटेशन्स जास्त वेगाने पसरणारी, तसेच रोगप्रतिकार क्षमतेला चकवा देणारी असल्याचे लक्षात आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने सांगितले. मात्र महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमागे कोरोनाव्हायरसची ही म्युटेशन कारणीभूत आहेत का? या प्रश्नावर आरोग्य मंत्रालयाने ते अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगितले. यासाठी आणखी नमुन्यांची तपासणी करावी लागेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले.