पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर दोन पाकिस्तानी घुसखोर ठार

नवी दिल्ली/अमृतसर – पंजाबमधील पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षादलांनी दोन पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले. ‘बीएसएफ’ने याआधीही याच भागातून घुसखोरीचे तीन प्रयत्न हाणून पाडले होते. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या अधिकार्‍यांनी दिली.

अमृतसरच्या राजातल सीमा चौकीजवळ रात्री २ वाजून २० मिनिटांच्या सुमारास जवानांना कुंपणाजवळ संशयित हालचाली दिसून आल्या. कुंपणाजवळ कोणीतरी सरपटत जात असल्याचा आवाज येथे तैनात असलेल्या जवानांना आला. घुसखोरांच्या हालचाली टिपल्या जाताच जवान सावध झाले आणि त्यांनी घुसखोरांना शरण येण्यास बजावले. मात्र घुसखोर जवानांवर गोळीबार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात येताच सावध बीएसएफच्या जवानांनी दोन घुसखोरांना ठार केले, असे बीएसएफच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

घटनास्थळावरून एके-५६ रायफल, सेमी-ऑटोमॅटिक रायफल, पिस्तुल, ९० बुलेट्स, पाच मॅगझिन आणि दोन पीव्हीसी पाईप जप्त करण्यात आले. या पाईपचा उपयोग अंमली पदार्थाचे पॅकेट्स सीमेपलिकडून भारतात पाठविण्यासाठी करण्यात येतो. हे पाईप सीमेवरील कुंपणाजवळ बसविण्याचे प्रयत्न या घुसखोरांकडून करण्यात करण्यात येत होते.

यापूर्वी रामकोट सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात पाच किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तर ऑगस्ट महिन्यात देखील घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. बीएसएफच्या जवानांनी यावेळी केलेल्या कारवाईत पाच घुसखोरांना ठार मारण्यात आले होते. पंजाबच्या तरणतारण येथे ही कारवाई करण्यात आली होती.

leave a reply