श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले असून १२ पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांमधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. या हल्यात पाकिस्तान पुरस्कृत दहतशतवादी संघटना ‘लश्कर-ए-तोयबा’चा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेत हल्ल्याची संपूर्ण माहिती मागवली आहे. तसेच हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास श्रीनगरमधील पंथा चौक परिसरातील झेवानजवळ मोटारसायकल वरून आलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबार केल्यानंतर हे दहशतवादी पसार झाले. पोलिसांची बस मुख्यालयात जात असताना हा हल्ला झाला.
या हल्ल्यात १४ पोलीस जखमी झाले. हल्ल्यानंतर तातडीने जखमी पोलिसांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान दोन पोलिसांची प्राणज्योत मालवली. शहीद पोलिसांमध्ये एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या ११ पोलिसांपैकी २ पोलिसांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. भारताच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण होत असतानाच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या अन्य राज्यातील मजूरांवरील दहशतवादी हल्ल्याच्या वाढत्या घटनांनंतर सुरक्षादलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यापासून हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेत मजूरांवरील हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी मारले गले आहेत. या दोन महिन्यात दहशतवाद्यांच्या कारवाया थंडावल्या होत्या.
पण आता दहशतवाद्यांनी पुन्हा डोकेवर काढण्यास सुरुवात केल्याचे दिसते. दोन दिवसापूर्वीच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते. त्यापूर्वी देखील करण्यात आलेल्या दहतशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला होता.