कॅनबेरा – चीनने साऊथ चायना सीच्या लष्करी तळावरुन आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले तर ऑस्ट्रेलियाचा दोन-तृतियांश भूभाग या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येईल. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील क्विन्सलँड, ‘नॉर्दन टेरिटरी’ आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाचा भूभाग चिनी क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेत येतात’, असा इशारा अमेरिकेतील प्रसिद्ध अभ्यासगटाने दिला.
चीनने ‘साऊथ चायना सी’मधील कृत्रिम बेटांच्या लष्करीकरणाचा वेग तीव्र केला आहे. येथील स्प्रार्टले द्विपसमुहातील ‘मिसचिफ रिफ’चे बांधकाम २०१४ साली पूर्ण झाल होते. याच बेटावर बांधलेल्या लष्करी तळावर चीनने ‘डाँगफेंग-२६’ आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची तैनाती केली आहे. किमान चार हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये असल्याचा दावा चीनच्या यंत्रणांनी केला आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील डार्विन हे लष्करी तळ ‘डाँगफेंग-२६’ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येते. याबरोबरच क्विन्सलँड प्रांताचा काही भूभाग आणि नॉर्दन टेरिटरीबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या अतिपश्चिमेकडील भूभागही चिनी आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेत येतात. अशा या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची मिसचिफ रिफवरील तैनाती इशारा देणारी असल्याचे ‘डिफेन्स स्ट्रॅटेजिक रिव्ह्यू’ या अमेरिकी अभ्यासगटाने म्हटले आहे.
चीनच्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा सामना करण्याआधी ऑस्ट्रेलियाच्या लष्कराने बचावासाठी उपाययोजना तयार कराव्या, असे आवाहन या अभ्यासगटाने केले आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडील तळांवर लष्करी जमवाजमव वाढवून चीनच्या हल्ल्यांना उत्तर देण्याची तयारी ठेवावी, असे या अभ्यासगटाने सुचविले. चीन आणि ऑस्ट्रेलिया तसेच येथील बेट देशांमधील संबंधात तणाव निर्माण झालेला आहे. ऑस्ट्रेलियाने बेटदेशांबरोबर लष्करी सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे संतापलेला चीन ऑस्ट्रेलियावर हल्ल्याची संधी चुकणार नाही, असा दावा या अभ्यासगटाने केला.