तालिन/वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ‘फर्स्ट इन्फंट्री डिव्हिजन’चे पथक रशियन सीमेला जोडून असलेल्या इस्टोनियात दाखल झाले. हे पथक इस्टोनियातील तारा या संरक्षणतळावर तैनात करण्यात आले असून हा भाग रशियाच्या सीमेपासून अवघ्या २० किलोमीटर्स अंतरावर आहे. या तुकडीपाठोपाठ अमेरिका इस्टोनियात ‘हायमार्स सिस्टिम प्लॅटून’ही तैनात करणार आहे. इस्टोनियाच्या लष्कराला हायमार्स सिस्टिमचे प्रशिक्षण देण्यात येणार असून २०२६ साली हायमार्स यंत्रणा इस्टोनियाच्या संरक्षणदलात सामील होईल, असेही सांगण्यात येते.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह नाटो देशांनी रशियन सीमेनजिक असलेल्या देशांमध्ये संरक्षणतैनाती मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही वर्षात बाल्टिक देशांसह रशियन सीमेनजिक असणाऱ्या इतर देशांमधील नाटोची लष्करी तैनाती एक लाखाहून वर गेलेली असेल, असे संकेत नाटोच्या प्रमुखांनी दिले आहेत. त्याचबरोबर या देशांमध्ये प्रगत संरक्षणयंत्रणा तैनात करण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे.
इस्टोनियाचा शेजारी देश असणाऱ्या लिथुआनियाने अमेरिकेबरोबर ४८.६ कोटी डॉलर्सच्या संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार, लिथुआनिया आठ ‘हायमार्स सिस्टिम्स’ तसेच ‘आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टिम’ खरेदी करणार आहे. २०२५ सालापासून या यंत्रणा लिथुआनियात दाखल होतील, असी माहिती देशाच्या संरक्षण विभागाने दिली. अमेरिकेव्यतिरिक्त ब्रिटन व फ्रान्स या देशांनीही बाल्टिक देशांना संरक्षणयंत्रणा पुरविण्याचा प्रस्ताव दिला आहे. नाटोच्या योजनेअंतर्गत ब्रिटन व फ्रान्सच्या लष्करी तुकड्या सध्या या देशांमध्ये तैनातही करण्यात आल्या आहेत.
हिंदी