अमेरिका युक्रेनला प्रगत हवाईसुरक्षायंत्रणा देणार

us nasams ukraineवॉशिंग्टन – रशियाकडून होणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या घणाघाती हल्ल्यांमुळे जेरीस आलेल्या युक्रेनला दोन प्रगत हवाईसुरक्षायंत्रणा देण्यास अमेरिकेने तयारी दर्शविली आहे. अमेरिकेची राजधानी, राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व इतर संवेदनशील जागांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘नॅसॅम्स’ यंत्रणा युक्रेनला पुरविण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या ‘रेदॉन’ या कंपनीने दोन नव्या ‘नॅसॅम्स’ अमेरिकी संरक्षणदलाकडे सुपूर्द केल्या असून येत्या काही आठवड्यांमध्ये त्या युक्रेनमध्ये दाखल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अमेरिका एकूण आठ हवाईसुरक्षायंत्रणा युक्रेनला देणार असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, अमेरिकेकडून युक्रेनला पुरविण्यात येणाऱ्या शस्त्रसाठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकी लष्कराची तुकडी युक्रेनमध्ये तैनात करण्यात आल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’कडून देण्यात आली.

गेल्या महिन्यापासून रशियाने युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांचे सत्र सुरू केले होते. या हल्ल्यांमुळे युक्रेनी यंत्रणा जेरीस आल्यास असून पायाभूत सुविधा व संवेदनशील यंत्रणांची मोठी हानी झाली आहे. रशियन बनावटीच्या तसेच नाटो सदस्य देशांनी पुरविलेल्या हवाईसुरक्षायंत्रणा हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे युक्रेनने अमेरिकेकडे प्रगत हवाईसुरक्षायंत्रणांची मागणी लावून धरली होती. त्याला अमेरिकेने मान्यता दिल्याचे नव्या माहितीवरून दिसत आहे. ‘नॅसॅम्स’ ही लघु पल्ल्याची हवाई सुरक्षायंत्रणा असून क्षेपणास्त्रे, ड्रोन व लढाऊ विमाने भेदण्यात सक्षम मानली जाते.

leave a reply