अबू धाबी – युएई इस्रायलच्या धोरणात्मक क्षेत्रात तब्बल १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. युएईचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायद आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात फोनवरुन झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करणार्या युएईची अब्जावधी डॉलर्सची ही गुंतवणूक लक्षवेधी ठरते. त्याचवेळी इस्रायली उद्योजकांनी युएईमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगव्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दावे केले जात आहेत. युएई व इस्रायलमधील हे सहकार्य आखातातील बदलाचे वारे वेगाने वाहू लागल्याचे दाखवून देत आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू गुरुवारी युएईच्या दौर्यावर जाणार होते. युएई आणि इस्रायलबाबतच्या सहकार्याबाबत पंतप्रधान नेत्यान्याहू क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायद यांच्याशी चर्चा करणार होते. पण जॉर्डनने ऐनवेळी इस्रायली पंतप्रधानांच्या विमानाला हवाईहद्दीतून वापर करण्यास विलंब केल्यामुळे सदर दौरा रद्द करावा लागला होता. यानंतर पंतप्रधान नेत्यान्याहू आणि क्राऊन प्रिन्स झायद यांच्यात फोनवरुन चर्चा पार पडली. युएईच्या मुखपत्राने दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचे तपशील प्रसिद्ध केले.
‘दोन्ही नेत्यांमध्ये रचनात्मक चर्चा पार पडली. यानंतर क्राऊन प्रिन्स झायद यांनी इस्रायलमध्ये १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. यासाठी इस्रायलचे ऊर्जा, उत्पादन, पाणी, अंतराळ, आरोग्य आणि कृषीतंत्रज्ञान या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये युएई गुंतवणूक करणार आहे. युएईचे सरकार तसेच खासगी कंपन्या ही गुंतवणूक करणार आहेत’, अशी माहिती सदर मुखपत्राने दिली.
ऐतिहासिक अब्राहम कराराच्या पार्श्वभूमीवर, युएई इस्रायलमध्ये ही धोरणात्मक गुंतवणूक करीत आहे. इस्रायल व युएई या क्षेत्रातील संपन्न अर्थव्यवस्था आहेत. या गुंतवणुकीमुळे उभय देशांचा अधिक विकास होईल, असा दावा युएईच्या वृत्तसंस्थेने केला. अशा प्रकारे इस्रायलमध्ये व्यापारी गुंतवणूक करणारा युएई हा तिसरा अरब देश ठरला आहे. याआधी १९७९ साली इजिप्त तर १९९४ साली जॉर्डनने इस्रायलमध्ये व्यापारी गुंतवणूक केली होती.
पण या धोरणात्मक गुंतवणूकीव्यतिरिक्त इस्रायल आणि युएईमध्ये संरक्षणविषयक सहकार्य देखील प्रस्थापित झाल्याचा दावा केला जातो. विमाननिर्मिती क्षेत्रातील इस्रायलची आघाडीची कंपनी ‘आयएआय’ आणि युएईची ‘एज’ या कंपन्या ड्रोनविरोधी तंत्रज्ञानासाठी एकत्र आल्या आहेत. इस्रायलच्या कंपनीने गुरुवारी सदर सहकार्याची घोषणा केल्याची माहिती इराणच्या वृत्तवाहिनीने दिली.
युएईने इस्रायलबरोबरील राजनैतिक सहकार्य प्रस्थापित केल्यानंतर, आर्थिक पातळीवरील सहकार्याला दिलेला वेग दोन्ही देशांचे संबंध अधिकच भक्कम करणारी बाब ठरते आहे. मुख्य म्हणजे दोन्ही देशांचे नागरिक या सहकार्याचे स्वागत करू लागले आहेत, असा दावा काही विश्लेषकांनी केला आहे. काही इस्रायली उद्योजकांनी युएईमध्ये उद्योगव्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचवेळी इस्रायलमध्ये येणार्या युएईच्या नागरिकांचे जोरदार स्वागत होत असल्याचे दावे या विश्लेषकांनी केले आहेत.
पुढच्या काळात या सहकार्याचे फार मोठे परिणाम आखाती क्षेत्रात दिसू शकतील. अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी इस्रायलने अरब-आखाती देशांबरोबर केलेला अब्राहम करार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगून यामुळे पॅलेस्टाईनच्या समस्येने वेठीस धरलेले आखाती देशांमधील सहकार्य खुले झाल्याचा दावा केला होता. त्याचा प्रभाव दिसू लागला असून युएईने इस्रायलमध्ये मुक्तपणे केलेली गुंतवणूक याची साक्ष देत आहे.