‘युएई’ला सोमालियाचा येमेन आणि लिबिया बनवायचा आहे

- सोमालियाच्या माहितीमंत्र्यांचा आरोप

मोगादिशु – ‘संयुक्त अरब अमिराती’ला सोमालियाची स्थिती लिबिया व येमेनप्रमाणे बनवायची असून देशात अराजक फैलावायचे आहे, असा आरोप सोमालियाच्या मंत्र्यांनी केला आहे. सोमालियात सध्या निवडणुकांच्या मुद्यावरून हिंसाचार भडकला असून त्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यावर चिंता व्यक्त करताना युएईने सोमालियातील सरकारचा उल्लेख ‘हंगामी सरकार’ असा करून हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त केली होती.

गेल्या महिन्यात सोमालियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्दुल्लाही मोहम्मद यांनी देशात 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केली होती. मात्र या मुद्यावर राजकीय पक्षांमध्ये एकमत घडविण्यात ते अपयशी ठरल्याने निवडणूक होऊ शकली नाही. या अपयशाचे कारण पुढे करून सोमालियातील काही राजकीय पक्षांनी राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासाठी देशात सुरू झालेली निदर्शने रोखण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे.

लष्कराने आंदोलन रोखण्यासाठी बळाचा वापर केला असून गेल्या आठवड्यात काही भागांमध्ये निदर्शक व लष्करात जोरदार चकमकीही उडाल्या. त्यात पाच जवानांचा बळी गेला असून अनेक निदर्शक जखमी झाले आहेत. आखातातील प्रमुख देश असणार्‍या ‘युएई’ने यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यात सोमालियाची राजधानी मोगादिशुमध्ये सुरू असणार्‍या हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली होती. सोमालियातील सर्व राजकीय पक्षांनी स्थिर भविष्याचा विचार करून संयम बाळगावा, असे आवाहनही करण्यात आले. या निवेदनात युएईच्या परराष्ट्र विभागाने सोमालियाच्या सरकारचा उल्लेख हंगामी सरकार असा केला होता.

या उल्लेखावर सोमालियात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. सोमालियाच्या परराष्ट्र विभागाने, एक परकीय राजवट देशातील स्थितीबाबत चुकीची माहिती पसरवित असून बंडाला चिथावणी देत आहे, असा आरोप केला होता. परराष्ट्र विभागाने देशाच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी त्यानंतर सोमालियाच्या माहितीमंत्र्यांनी ‘युएई’चे थेट नाव घेऊन सोमालियातील हिंसेमागे थेट युएईचाच हात असल्याचे संकेत दिले.

‘युएईने दिलेले निवेदन आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजनैतिक चौकटीशी विसंगत आहे. त्यांचे वक्तव्य दोन देशांमधील संबंध व अरब संस्कृतीला शोभणारे नाही. युएईला सोमालियाची स्थिती येमेन आणि लिबियाप्रमाणे करायची आहे. संयुक्त अरब अमिरातीला सोमालियात अराजक फैलावायचे आहे’, असा आरोप सोमालियाचे माहितीमंत्री ओस्मान डुब्बे यांनी केला. निवडणुका सोमालियाची अंतर्गत बाब असून इतर कोणत्याही देशाला त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असेही सोमालियाच्या माहितीमंत्र्यांनी बजावले.

युएईचे निवेदन व सोमालियाच्या मंत्र्यांनी केलेले आरोप यामुळे दोन देशांमधील संबंध अधिकच तणावपूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षात सोमालियात तुर्की व कतारचे वर्चस्व वाढत असून त्यामुळे युएई व इजिप्तसारखे देश अस्वस्थ झाले आहेत. सोमालियाच्या सरकारने तुर्की व कतारच्या दबावाखाली येऊन देशातील युएईचा लष्करी प्रशिक्षण तळ बंद केल्याचे मानले जाते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युएईने सोमालियातील स्वायत्त प्रांत असणार्‍या ‘सोमालीलॅण्ड’बरोबर स्वतंत्र करार करून नवे बंदर व तळ उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सोमालियातील सरकारही भडकले असून देशातील हिंसाचार व समस्यांसाठी थेट युएईवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. सोमालियातील घटना आफ्रिकी देशांवरील वर्चस्वासाठी अरब व आखाती देशांमध्ये पेटणार्‍या संभाव्य संघर्षाचे संकेत असल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply