किव्ह/लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान ॠषी सुनक यांनी शनिवारी युक्रेनला भेट दिली. या भेटीत त्यांनी युक्रेनला सहा कोटी डॉलर्सच्या संरक्षणविषयक सहाय्याची घोषणा केली. ब्रिटनच्या संरक्षणसहाय्यात ‘अँटी एअरक्राफ्ट गन्स’ व ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. युक्रेनला संरक्षणसहाय्य पुरविणाऱ्या देशांमध्ये ब्रिटनचा अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक लागतो. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून ब्रिटनने युक्रेनला सुमारे अडीच अब्ज डॉलर्सचे लष्करी सहाय्य जाहीर केले आहे.
गेल्या काही दिवसात रशिया व युक्रेनमधील लढाई दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे संकेत मिळत आहेत. रशिया व युक्रेन या दोन्ही देशांमध्ये येणारा कडक हिवाळा आणि संभाव्य शांतीचर्चा या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरू आहेत. त्याचवेळी अमेरिका तसेच युरोपकडून युक्रेनला होणाऱ्या शस्त्रपुरवठ्यात घट होण्याच्या बातम्याही प्रसिद्ध होत आहेत. अशा परिस्थितीत ब्रिटनच्या पंतप्रधानांनी युक्रेनला भेट देऊन जाहीर केलेले हे लक्ष वेधून घेणारे ठरते.
हे सहाय्य घोषित करताना पंतप्रधान सुनक यांनी पुढील काळातही ब्रिटनकडून करण्यात येणाऱ्या मदतीत खंड पडणार नाही, असे आश्वासनही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना दिले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही ब्रिटनचे आभार मानताना हा देश युक्रेनचा मजबूत सहकारी असल्याचा दावा केला. संरक्षणसहाय्यापाठोपाठ ब्रिटनने युक्रेनला सुमारे दोन कोटी डॉलर्सचे अतिरिक्त सहाय्यही जाहीर केले. यात युक्रेनमधील अन्नधान्यासाठी सुमारे दीड कोटी डॉलर्स तर युक्रेनमधून निर्वासित होणाऱ्या नागरिकांच्या सहाय्यासाठी पन्नास लाख डॉलर्स निधीचा समावेश आहे.