युक्रेन ही युरोपची समस्या आहे, अमेरिकेची नाही

- अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा बायडेन यांना टोला

वॉशिंग्टन – युक्रेनमध्ये निर्माण झालेला तणाव ही युरोपची समस्या आहे आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी त्यात अमेरिकेला अडकवू नये, असा टोला अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल किथ केलॉग यांनी लगावला आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन चीनच्या खर्‍या धोक्याचा मुकाबला करण्याऐवजी युक्रेनवर वेळ व शक्ती वाया का घालवित आहेत, असा मर्मभेदी सवाल केलॉग यांनी केला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही युक्रेनचा उल्लेख ‘युरोपियन प्रॉब्लेम’ असा केला असून तो सोडविण्यासाठी युरोपने पुढाकार घ्यायला हवा, असा दावा केला आहे.

युक्रेन ही युरोपची समस्या आहे, अमेरिकेची नाही - अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा बायडेन यांना टोलागेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेन सीमेवरील तैनाती पुन्हा वाढवित असल्याचे समोर येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर आक्रमण करतील, असे दावे युक्रेनसह अमेरिकी विश्‍लेषक करीत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यास राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावरही निर्बंध लादले जाऊ शकतात, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बजावले होते. त्याचवेळी युक्रेनच्या सुरक्षेसाठी युरोपात ५० हजारांपर्यंत जवान तैनात करण्याचे संकेतही दिले होते. मात्र बायडेन यांच्या युक्रेन धोरणावर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी सल्लागार केलॉग व ट्रम्प यांची वक्तव्ये त्याला दुजोरा देणारी ठरतात.

युक्रेन ही युरोपची समस्या आहे, अमेरिकेची नाही - अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा बायडेन यांना टोला‘राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांचे सल्लागार अफगाणिस्तानच्या मुद्यावर अपयशी ठरले होते आणि आता युक्रेनमध्येही तेच घडण्याचे संकेत मिळत आहेत. युक्रेनच्या मुद्यावर ठोस यश मिळेल असा कोणताच पर्याय किंवा मार्ग नाही. अमेरिकेच्या सामर्थ्याचा थेट वापर हा तर त्यासाठीचा पर्याय नक्कीच नाही. युक्रेन ही प्राधान्याने युरोपियन समस्या आहे व ती त्यांनीच सोडवायला हवी. मात्र युरोपिय देश त्यात अपयशी ठरले आहेत’, असे अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी बजावले.

युरोप आजही रशियाकडून आयात होणार्‍या ३५ टक्के इंधनावर अवलंबून आहे, याकडेही केलॉग यांनी लक्ष वेधले. जर्मनीने युक्रेनला शस्त्रपुरवठा करणार्‍या ब्रिटनला आपली हवाईहद्द वापरू दिली नव्हती, ही एक गोष्ट युरोपिय देशांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दाखवून देते, असा दावाही त्यांनी केला. युक्रेन ही युरोपची समस्या आहे, अमेरिकेची नाही - अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा बायडेन यांना टोलागेल्या आठ वर्षात युक्रेनच्या डोन्बासवर तोडगा निघालेला नाही, याची जाणीवही केलॉग यांनी करून दिली. त्याचवेळी रशियासाठी युक्रेन हा अतिशय महत्त्वाचा व सुरक्षेशी जोडलेला मुद्दा असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी तो लष्करी माध्यमातून सोडवायचे ठरविले आहे, असा दावाही माजी सल्लागार केलॉग यांनी केला आहे.

युक्रेन समस्येतील अमेरिकेचा हस्तक्षेप चीनच्या वाढत्या धोक्यापासून अमेरिकेला दूर नेणारा ठरु शकतो व हे पुतिन यांच्या हल्ल्याचे एक उद्दिष्ट असू शकते, असे संकेतही केलॉग यांनी दिले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही युक्रेनचा उल्लेख युरोपियन समस्या असा केला असून जर्मनीवर रशियाचे नियंत्रण असल्याने तो संघर्ष करणार नाही, असा दावा केला आहे.

leave a reply