व्हर्साय/किव्ह – रशियाविरोधातील युद्धाचा वापर करून युरोपिय महासंघ व नाटोला सदस्यत्त्व देण्यासाठी भाग पाडण्याचा युक्रेनचा प्रयत्न सध्या तरी फसल्याचे दिसत आहे. युरोपिय महासंघ तसेच नाटोच्या नेत्यांनी सदस्यत्त्वाच्या मुद्यावरून युक्रेनच्या तोंडाला पाने पुसल्याचे शुक्रवारी उघड झाले. व्हर्सायमध्ये झालेल्या बैठकीत, एका रात्रीत युरोपिय महासंघाचे सदस्यत्व मिळण्याची अपेक्षा युक्रेनने ठेऊ नये, असे महासंघाच्या नेत्यांनी बजावले. तर युक्रेनला नाटोचे सदस्यत्व तातडीने मिळवून देण्याची कोणतीही योजना नव्हती, असे नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी स्पष्ट केले.
गेल्या महिन्यात युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू करण्यापूर्वी रशियाने पाश्चिमात्य देशांबरोबर राजनैतिक स्तरावर वाटाघाटी केल्या होत्या. या वाटाघाटींमध्ये युक्रेनला युरोपिय महासंघ तसेच नाटोच्या सदस्यत्वापासून दूर ठेवण्याच्या मागणीचा समावेश होता. मात्र पाश्चिमात्य देशांनी या मागण्या फेटाळल्या होत्या. युक्रेननेही आपण युरोपचा भाग असल्याचे सांगून संसदेत नाटो तसेच महासंघाच्या सदस्यत्त्वासाठी विशेष ठरावही मंजूर केले होते. पाश्चिमात्य देशांनी या मुद्यावरून युक्रेनला भरमसाठ आश्वासनेही दिली होती.
प्रत्यक्षात रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर अमेरिकेसह इतर मित्रदेशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात सहाय्य पुरविले आहे. पण महासंघ किंवा नाटोच्या सदस्य देशाला ज्या प्रमाणात मदत मिळू शकते त्या प्रमाणात मदत केलेली नाही. नाटोेने युक्रेनकडून करण्यात आलेला ‘नो फ्लाय झोन’चा प्रस्तावही स्पष्ट शब्दात फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनने नाटो तसेच युरोपिय
महासंघावर टीकाही केली होती. काही दिवसांपूर्वीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओत, युक्रेन नाटोत सहभागी होण्याची योजना सोडून देऊ शकतो, असे उद्वेगाने म्हटल्याचे समोर आले होते.
मात्र त्यानंतरही दोन्ही आघाडीच्या संघटनांनी सदस्यत्त्वाच्या मुद्यावर आपली भूमिका बदलली नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. शुक्रवारी फ्रान्सच्या व्हर्साय शहरात युरोपिय महासंघाची बैठक झाली. या बैठकीत महासंघाच्या नेत्यांनी युक्रेनला तातडीने सदस्यत्व देण्याची योजना नसल्याचे स्पष्ट केले.
‘सध्या युद्धात असलेल्या एका देशाला सदस्यत्व देण्यासाठी प्रक्रिया सुरू करता येईल का? या प्रश्नाचे उत्तर बहुधा नाही, असेच आहे’, या शब्दात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी युक्रेनला सदस्य बनविण्याची शक्यता फेटाळून लावली. क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेन्कोव्हिक यांनी, एका रात्रीत कोणीही युरोपिय महासंघात प्रवेश करु शकत नाही, अशा शब्दात युक्रेनला ताबडतोब सदस्यत्व देण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले. त्यापूर्वी महासंघाच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख असलेले जोसेप बोरेल यांनी, युक्रेन व जॉर्जिया या देशांना नाटोच्या सदस्यत्त्वाची आशा दाखविणे ही मोठी चूक असल्याची कबुली दिली.
तुर्कीत झालेल्या एका बैठकीत, नाटोचे महासचिव जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी युक्रेनला तातडीने नाटोचे सदस्यत्व देण्याची कोणतीही योजना नव्हती, असा खुलासा केला आहे. त्याचवेळी नजिकच्या भविष्यातही युक्रेनला लगेच सदस्यत्व दिले जाईल, अशी शक्यता नसल्याचे स्टॉल्टनबर्ग म्हणाले. महासंघ तसेच नाटो नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे, रशियाविरोधात संघर्ष करून वाताहत करून घेतल्यानंतरही युक्रेनला युरोपिय महासंघ अथवा नाटो स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.