किव्ह/ब्रुसेल्स – रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी मोहिमेनंतर २० दिवसांच्या अवधीत युक्रेनमधून २८ लाखांहून अधिक जण युरोपात निर्वासित म्हणून दाखल झाले आहे. त्यातील १७ लाखांहून अधिक निर्वासित एकट्या पोलंडमध्ये आले असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. युक्रेनचे शेजारी देश मोठ्या संख्येने निर्वासित स्वीकारत असतानाच जर्मनीने मात्र युक्रेनी निर्वासितांच्या स्पेशल ट्रेन्स बंद कराव्यात, अशी विनंती केल्याचे समोर आले आहे.
गेल्या महिन्याच्या अखेरीस रशियाने युक्रेनविरोधातील लष्करी कारवाई सुरू केली होती. दिवसेंदिवस रशियन हल्ल्यांची तीव्रता वाढत असून युक्रेनी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. रशियाने गेल्या काही दिवसात पश्चिम युक्रेनमध्येही हल्ले चढविले असून त्यानंतर या भागांमधील जनतेनेही देश सोडण्यास सुरुवात केली आहे. राजधानी किव्हसह खारकिव्ह, मारिपोल, ओडेसा, लिव्ह या शहरांमधून मिळेल त्या मार्गाचा वापर करून हजारोंच्या संख्येने निर्वासित बाहेर पडू लागले आहेत.
पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया, रोमानिया व मोल्दोव्हाच्या सीमांवर युक्रेनी नागरिकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. एकट्या पोलंडमध्ये १७ लाखांहून अधिकजण युक्रेनी निर्वासित म्हणून दाखल झाल्याची माहिती पोलिश यंत्रणांनी दिली. काही नागरिक पुढे जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्येही जात असल्याचे समोर आले आहे. युक्रेनमधून नक्की कितीजण बाहेर पडतील, याचा अंदाज नसला तरी अमेरिकी व युरोपिय अधिकार्यांनी ही संख्या ५० लाखांपर्यंत जाऊ शकते, असा दावा केला आहे.
दरम्यान, रशियाच्या हल्ल्यांचे तीव्र परिणाम युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर होतील, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला. या वर्षात युक्रेनची अर्थव्यवस्था तब्बल ३५ टक्क्यांनी घसरेल, असे नाणेनिधीने बजावले आहे. रशियन कारवाईच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या अर्थव्यवस्थेत १० टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यातून सावरण्यासाठी नाणेनिधीसह इतर देशांना अब्जावधी डॉलर्सचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. यात नाणेनिधीने मंजूर केलेल्या १.४ अब्ज डॉलर्सच्या ‘इमर्जन्सी फंड’चाही समावेश आहे.