डॅव्होस – ‘युक्रेनने आतापर्यंत दाखविलेल्या धैर्याला ते थोड्या हुशारीचीही जोड देतील, अशी आशा आहे. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात शांतीकरारासाठी प्रयत्न करायचे असतील तर युक्रेनने आपला थोडा भूभाग रशियाला द्यायला हवा’, असा सल्ला अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी दिला. पाश्चिमात्य देशांनी रशियाचे युरोपातील सामर्थ्यशाली स्थान विसरुन भावनेच्या भरात वाहून जाऊ नये, तसे करणे घातक ठरेल, अशी चपराकही किसिंजर यांनी पाश्चिमात्य देशांना लगावली आहे.
डॅव्होसमधील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत बोलताना किसिंजर यांनी युक्रेन व पाश्चिमात्य देश रशियाचे सामर्थ्य विसरले असून युद्ध लांबवित असल्याचा ठपका ठेवला. ‘रशियाचा मानहानिकारक पराभव करण्याचे इरादे पाश्चिमात्यांनी बाजूला ठेवायला हवेत. पाश्चिमात्य सध्या भावनेच्या भरात वाहून जात असल्याचे दिसत आहे. युरोपच्या सत्तासमतोलात रशियाचे स्थान काय आहे, हे ते विसरले आहेत. युद्ध अजून जास्त काळ लांबविता कामा नये. युक्रेनने येत्या दोन महिन्यात वाटाघाटी सुरू करायला हव्यात. मोठी उलथापालथ व नवे तणाव निर्माण होण्यापूर्वी चर्चेला सुरुवात व्हायला हवी’, असे किसिंजर यांनी सुचविले.
एका विशिष्ट मर्यादेपलिकडे युद्ध चालू ठेवण्याचा हेका कायम राखता कामा नये. तसे झाले तर ते रशियाविरोधात पुकारलेले नवे युद्ध ठरेल, असा इशाराही अमेरिकी मुत्सद्यांनी दिला. यावेळी किसिंजर यांनी पाश्चिमात्य देशांना रशियाच्या युरोपमधील स्थानाची जाणीवही करून दिली. ‘गेल्या चार शतकांहून अधिक काळ रशिया युरोपचा अविभाज्य भाग आहे. युरोपिय नेत्यांनी रशियाबरोबरील दीर्घकालिन संबंधांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करु नये. तसे केले तर रशिया-चीनमध्ये कायमस्वरुपी आघाडी तयार होण्याचा धोका आहे’, याकडे अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी लक्ष वेधले.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून बहुतांश पाश्चिमात्य नेते व मुत्सद्दी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी छेडलेल्या युक्रेन युद्धावर जहाल शब्दात टीका करीत आहेत. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना धडा शिकवायला हवा व त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने युक्रेनला सर्वतोपरी सहाय्य पुरवायला हवे, असा सूर पाश्चिमात्य देशांनी लावून धरला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही डॅव्होसमधील बैठकीत, पुतिन यांना जिंकू देता कामा नये असे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर, किसिंजर यांच्यासारख्या अनुभवी व ज्येष्ठ मुत्सद्याने युक्रेनसह पाश्चिमात्य देशांना सुनावलेले खडे बोल लक्ष वेधून घेणारे ठरतात.