युक्रेनचे युद्ध अधिक भीषण स्वरुप धारण करील

- पुतिन-मॅक्रॉन चर्चेनंतर फ्रान्सचा इशारा

मॉस्को/पॅरिस – रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यात भयंकर विध्वंस व जीवितहानी झाली असून सारे जग याने हवालदिल बनले आहे. पण हा संहार इथेच थांबणार नाही, उलट हे युद्ध अधिक भीषण स्वरूप धारण करील, असा इशारा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दिला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर फोनवर तब्बल ९० मिनिटे चर्चा केल्यानंतर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेला हा इशारा पाश्‍चिमात्यांसह सार्‍या जगात सनसनाटी माजविणारा ठरू शकतो.

रशिया व युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धाला आठ दिवस उलटले असून दोन देशांमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक चिघळत चालल्याचे चित्र समोर येत आहे. अमेरिका, युरोप व मित्रदेश युक्रेनच्या पाठीशी उभे असून त्याला सर्व प्रकारची आर्थिक व लष्करी मदत पुरविण्यात येत आहे. त्याचवेळी रशिया युक्रेनची राजधानी किव्हसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळविण्यासाठी व्यापक व तीव्र हल्ले चढवित आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांबरोबर दुसर्‍यांदा फोनवरून केलेली चर्चा लक्ष वेधून घेणारी ठरते.

गुरुवारी झालेल्या चर्चेदरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्षांनी अत्यंत स्पष्ट शब्दात, युक्रेनमधील उद्दिष्टे पूर्ण झाल्याशिवाय रशिया माघार घेणार नाही, असे संकेत दिले. आपल्या उद्दिष्टांमध्ये युक्रेनचे नि:शस्त्रीकरण व तो बाह्य प्रभावापासून अलिप्त राहिल याची हमी यांचा समावेश असल्याचेही पुतिन यांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना सांगितल्याचे रशियाने म्हटले आहे. ‘कुठल्याही परिस्थितीत युक्रेनमधी लष्करी उद्दिष्टे रशिया साध्य करील. पण यावरील चर्चा लांबवून अधिक वेळ घालविण्याचे प्रयत्न झाल्यास रशियाच्या मागण्या वाढू शकतात’, असे पुतिन यांनी बजावल्याचे रशियाने म्हटले आहे.

पुतिन व मॅक्रॉन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर फ्रान्स सरकारकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनात मॅक्रॉन यांनी आपण रशियन राष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. पुतिन यांनी संघर्ष थांबवावा यासाठी शक्य तितका काळ मी त्यांच्याबरोबर चर्चा सुरू ठेवेन, असे सांगून फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी या चर्चेचे समर्थन केले. त्याचवेळी त्यांनी पुतिन यांनी युक्रेनसंदर्भात स्वीकारलेल्या आक्रमक पवित्र्याचा उल्लेख केला. ‘युक्रेनमध्ये सुरू झालेला संघर्ष हे पुतिन यांचे युद्ध आहे. पुतिन यांना पूर्ण युक्रेन ताब्यात हवा आहे. त्यामुळे येणार्‍या काळात युक्रेनचे युद्ध अधिकच भीषण बनेल’, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बजावले. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन य्वेस ले द्रिआन यांनीही आपल्या पत्रकारपरिषदेत याचा पुनरुच्चार केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पुतिन यांच्या बेदरकार कारवायांमुळे संपूर्ण युरोपची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केला.

leave a reply