रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या लुहान्स्कची दारूण अवस्था

- लुहान्स्कच्या गव्हर्नरांचा आरोप

किव्ह – युक्रेनच्या लुहान्स्क प्रांताचा ताबा घेतल्याचे दावे रशियाने केले असले, तरी अजूनही यावर पूर्णपणे रशियाचे नियंत्रण प्रस्थापितझालेले नाही. म्हणूनच या भागावरील रशियन सैन्याचे हल्ले थांबलेले नाहीत. या भागाचा रशियाने अक्षरशः नरक बनविला आहे, असा ठपका लुहान्स्कच्या गव्हर्नरांनी केला. रशियाच्या हल्ल्यात अजूनही लुहान्स्कच्या सिएव्हेरोडोनेत्स्क असलेली सुमारे आठ हजाराहून अधिक जनता जिवंतपणी नरकयातना भोगत असल्याचे गर्व्हनर सराही हैदाई यांनी म्हटले आहे. त्याचवेळी रशियाने युक्रेनच्या सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात करून युद्धाची तीव्रता वाढविण्याची तयारी केल्याची माहिती ब्रिटनच्या गुप्तचर विभागाने दिली आहे.

युक्रेनमध्ये अजूनही रशियाने खरे युद्ध सुरू केलेलेच नाही, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावले आहे. रशियाने आपली पूर्ण लष्करी क्षमता वापरली तर युक्रेनमध्ये हाहाकार माजेल, हे रशियन राष्ट्राध्यक्ष वेगळ्या शब्दात बजावत आहेत. रशियन लष्कराने डोंबासचा भाग असल्या युक्रेनच्या लुहान्स्क प्रांताचा ताबा घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र अजूनही काही प्रमाणात युक्रेनचे लष्कर या भागात रशियन सैन्याचा प्रतिकार करीत असल्याची माहिती लुहान्स्कच्या गव्हर्नरांनी दिली. या संघर्षात लुहान्स्कच्या सिएव्हेरोडोनेत्स्क शहराची अवस्था भयंकर बनल्याचे गव्हर्नर हैदाई यांनी म्हटले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी रशियाने लुहान्स्कमधील सिएव्हेरोडोनेत्स्क शहराचा ताबा घेतला होता. पण या शहरात पिण्याचे पाणी, वीज तसेच प्रेतांचा खच पडलेला असताना, त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही. अशा स्थितीत सिएव्हेरोडोनेसत्स्क शहरातील जनता जिवंतपणी नरकयातना भोगत असल्याची टीका केली. युक्रेनच्या पूर्वकडील भूभागात इतकी भयंकर स्थिती असली, तरी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की युक्रेन माघार घेणार नसल्याचे दावे ठोकले आहेत. यासाठी त्यांनी पाश्चिमात्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची मागणी केली आहे.

मात्र पाश्चिमात्यांनी युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविली, तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असे रशिया पुन्हा पुन्हा बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अजूनही ‘खरे युद्ध’ सुरूच झालेले नाही, असे सांगून युक्रेनसह पाश्चिमात्यांना विचार करायला भाग पाडणारा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याबरोबरच युक्रेनच्या प्रांतांवरील हल्ल्याची तीव्रता टप्प्या टप्प्याने वाढवून रशियाने आपल्या लष्करी सामर्थ्याची जाणीव युक्रेनसह पाश्चिमात्यांनाही करून दिली आहे.

रशियाने आपल्या सैन्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या असून युक्रेनच्या सीमेजवळ रशियाने अतिरिक्त सैन्य आणून ठेवल्याचे माहिती ब्रिटनच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. पुढच्या काळात रशिया युक्रेनच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करील. त्यासाठी रशियन सैन्याची पूर्वतयारी सुरू आहे. त्याचा भाग म्हणून रशियन सैन्याची युक्रेनच्या सीमेवर हालचाली सुरू असल्याचे ब्रिटनच्या गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे.

leave a reply