किव्ह/मॉस्को – युक्रेनने रशियाच्या बेलगोरोद प्रांतात ड्रोनहल्ले चढविले आहेत. रविवारी रात्री केलेल्या या हल्ल्यांमध्ये बेलगोरोद प्रांतातील दोन वीजपुरवठा केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या हल्ल्यामुळे हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येते. युक्रेनच्या सीमेला जोडून असलेल्या बेलगोरोद प्रांताला गेल्या वर्षापासून सातत्याने लक्ष्य करण्यात येत असून यापूर्वीही प्रांतातील नागरी वस्त्या, मॉल्स, कारखाने व संरक्षणतळांवर हल्ले झाले होते. रशियाकडून गेले काही आठवडे पूर्व युक्रेनसह युक्रेनमधील इतर भागांवर जोरदार मारा सुरू आहे. या माऱ्यात युक्रेनी लष्कराची मोठी हानी झाल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी बाखमतवर लक्ष केंद्रित केल्याने युक्रेनवर पाश्चिमात्य देशांकडून टीका होत असून रशियाविरोधातील प्रतिहल्ल्यांच्या योजनेवरही प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनने बेलगोरोद प्रांतात केलेला ड्रोनहल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो.
रविवारी रात्री बेलगोरोद प्रांतातील इगुमेन्का व ड्रॅगुन्स्को या गावांमधील वीजपुरवठा केंद्रांवर ड्रोनहल्ले झाले. या हल्ल्यांमुळे वीजपुरवठा केंद्रांना मोठी आग लागली. आग व धुराचे मोठे लोट आजूबाजूच्या गावांमधूनही दिसत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. बेलगोरोद प्रांताच्या गव्हर्नरनी हल्ले झाल्याची कबुली दिली आहे. या हल्ल्यांमुळे हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित झाला असून तो पूर्वपदावर येण्यास अनेक दिवस लागतील, असे स्थानिक यंत्रणांकडून सांगण्यात आले.
युक्रेनचे ड्रोन्स रशियन प्रांतांवर हल्ले चढवित असतानाच, येत्या काही आठवड्यात युक्रेन आपली ‘एअर डिफेन्स’ क्षमता गमावेल, असा इशारा युक्रेनच्या हवाईदलाने दिला आहे. युक्रेनच्या हवाईसुरक्षा यंत्रणांमध्ये ‘बक’ व ‘एस-300’ या यंत्रणांचा समावेश आहे. या यंत्रणांसाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचा साठा संपत आला आहे. पाश्चिमात्य देशांनी पुरविलेल्या हवाईसुरक्षा यंत्रणा व त्यातील क्षेपणास्त्रांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात युक्रेनच्या हवाईसुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी बजावले.
हवाईसुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्यास युक्रेनची प्रतिहल्ल्यांची मोहीमही अडचणीत येऊ शकते, याकडे युक्रेनच्या हवाईदलाने लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या ‘पेंटॅगॉन लीक’मध्येही अमेरिकी अधिकाऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केल्याचे उघड झाले होते. रशियन संरक्षणदले याचा फायदा उचलून युक्रेनवरील क्षेपणास्त्र व ड्रोनहल्ल्यांची तीव्रता वाढवू शकतात, असा दावाही युक्रेन तसेच पाश्चिमात्य यंत्रणा करीत आहेत.
दरम्यान, बाखमतमध्ये सुरू असलेल्या तीव्र संघर्षात रशियन फौजांनी दोन भाग ताब्यात घेतल्याचा दावा रशियाच्या संरक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.