संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद लवकरच तालिबानविरोधात मोठा निर्णय घेणार

वॉशिंग्टन – गेल्या महिन्याभरात तालिबानने अफगाणी महिलांवर बुरख्याची सक्ती करून मुलींच्या शिक्षणावर बंदी टाकली आहे. सदर प्रकरण संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पोहोचले. अफगाणी मुली व महिलांबाबतचे तालिबानचे धोरण गळचेपी करणारे असल्याची टीका सुरक्षा परिषदेतील सदस्य देशांनी केली. त्याचबरोबर लवकरच तालिबानविरोधात मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचे संकेत सुरक्षा परिषदेने दिले आहेत.

गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानातील महिलांसाठी नवे नियम जाहीर केले. यापुढे अफगाणी महिलांना डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीर झाकणारे कपडे परिधान करावे लागतील. तसेच आवश्यकता असल्याशिवाय अफगाणी महिलांना घराबाहेर पडू नये, अशी सूचना तालिबानने केली. यामुळे तालिबान 20 वर्षांपूर्वी प्रमाणे आपली राजवट प्रस्थापित करू पाहत आहे असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

तालिबानने अशा सूचना केल्या असल्या तरी अफगाणी महिलांनी त्याला दाद दिली नसल्याचेही समोर आले आहे. राजधानी काबुलमध्ये अफगाणी महिलांनी साध्या वेषात तालिबानच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. अफगाणी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानासमोर या अफगाणी महिलांनी धडक दिली. यानंतर तालिबानने या निदर्शकांवर कारवाई केली.

तालिबानचे नवे नियम तसेच अफगाणी महिलांवरील कारवाईच्या विरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी तालिबानच्या राजवटीने महिलांवर लादलेल्या बंदीवर टीका केली. अफगाणिस्तानातील भीषण आर्थिक आणि मानवतावादी परिस्थितीकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी तालिबान महिला-मुलींचे अधिकार चिरडत असल्याचे ताशेरे नॉर्वेच्या उपराजदूतांनी ओढले. आयरलँड, मेक्सिकोच्या राजदूतांनी देखील तालिबानच्या राजवटीत महिलांवरील अत्याचार नव्याने सुरू झाल्याचा आरोप केला.

तर ब्रिटनच्या राजदूत बार्बरा वुडवर्ड यांनी तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणी महिला-मुलींचे अधिकार पायदळी चिरडले जात असल्याचा ठपका ठेवला. तालिबानची राजवट येण्याआधी, गेल्या 20 वर्षात अफगाणिस्तानात 36 लाख मुली शालेय शिक्षण घेत होत्या. तर अफगाणी संसदेत एक तृतियांश महिला लोकप्रतिनिधींचा समावेश होता. अफगाणिस्तानातील कामगार वर्गात देखील महिलांचे 20 टक्के इतके प्रमाण होते, याकडे वुडवर्ड यांनी लक्ष वेधले.

संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद तालिबानच्या राजवटीवर फक्त टीका करुन थांबणार नसल्याचे वुडवर्ड यांनी स्पष्ट केले. येत्या काही तासात सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि महिला-मुलींचे अधिकार याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती ब्रिटनच्या राजदूतांनी दिली.

दरम्यान, अफगाणी मुलींच्या शिक्षणावर निर्बंध लादणाऱ्या तालिबानी नेत्यांच्या मुली मात्र शिक्षण घेत असल्याचे उघड झाले आहे. तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहिन याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या दोन्ही मुली शाळेत शिक्षण घेत असल्याची कबुली दिली. सुहेल शाहिनप्रमाणे तालिबानच्या इतर नेत्यांच्या मुली देखील शिक्षण घेत असल्याचा दावा केला जातो. यामुळे तालिबानचा दुटप्पीपणा अधिक प्रकर्षाने जगासमोर आला असून त्यावर जोरदार टीका होत आहे.

leave a reply