अमेरिकी काँग्रेसच्या मध्यावधी निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडणार

- रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर टेड क्रूझ यांचा इशारा

अविश्‍वास प्रस्ताववॉशिंग्टन – अमेरिकेत यावर्षी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीनंतर रिपब्लिकन पार्टीला प्रतिनिधीगृहात बहुमत मिळेल व आपला पक्ष राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडेल, असा इशारा पक्षाचे वरिष्ठ सिनेटर टेड क्रूझ यांनी दिला. डेमोक्रॅट पक्षाने अविश्‍वास ठरावाचा वापर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात शस्त्रासारखा केला होता, याची आठवणही सिनेटर क्रूझ यांनी करून दिली. क्रूझ अविश्‍वास ठरावाचा दावा करीत असतानाच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात अमेरिकी मतदारांमधील नाराजी अधिकच वाढत असल्याचे नव्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘सीएनबीसी/चेंज` यांच्या नव्या सर्वेक्षणानुसार 56 टक्के अमेरिकी मतदार बायडेन यांच्या कारभारावर नाराज आहेत.

अमेरिकेत या वर्षाच्या अखेरीस संसदेतील दोन्ही सभागृहांसह राज्यांच्या गव्हर्नर पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. प्रतिनिधीगृहाच्या सर्व 435 जागा, सिनेटच्या 34 जागा व 36 गव्हर्नर्ससाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीनंतर प्रतिनिधीगृहावर रिपब्लिकन पक्ष वर्चस्व मिळवेल, असा दावा सिनेटर टेड क्रूझ यांनी केला. निवडून आलेल्या रिपब्लिकन संसद सदस्यांवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात अविश्‍वास ठरावाची प्रक्रिया चालविण्यासाठी दडपण असेल, असे क्रूझ यांनी सांगितले.

‘डेमोक्रॅट पक्षाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे पटत नसल्याने निर्माण झालेल्या मतभेदांसाठी अविश्‍वास ठरावाचा वापर केला. डेमोक्रॅट्सनी अविश्‍वास प्रक्रिया शस्त्राप्रमाणे वापरली. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षही त्याच धर्तीवर अविश्‍वास प्रक्रियेचा वापर करेल. बायडेन यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांच्या सीमेवर निर्माण झालेली समस्या व निर्वासितांची घुसखोरी हा त्यातील प्रमुख मुद्दा ठरु शकतो`, असा इशारा क्रूझ यांनी दिला. रिपब्लिकन पक्षाच्या काही संसद सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन याचे उद्योग हा देखील अविश्‍वास ठरावाचा मुद्दा होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.

दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच बायडेन यांच्या लोकप्रियतेत होणारी घसरण कायम असल्याचे समोर आले आहे. ‘बॉर्डर क्रायसिस`पाठोपाठ अर्थव्यवस्था व कोरोनाची हाताळणी या मुद्यांवरून अमेरिकी मतदार बायडेन यांच्यावर नाराज असल्याचा निष्कर्ष नव्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आला आहे. ‘सीएनबीसी/चेंज` सर्वेक्षणानुसार बायडेन यांच्यावर नाराज असणाऱ्या मतदारांची संख्या 56 टक्क्यांवर गेली असून हा नवा नीचांक मानला जातो.

leave a reply