चीनच्या शिकारी राजकीय धोरणाविरोधात अमेरिका आणि युरोपने एकजूट करावी

-युरोपिय महासंघाचे राजदूत निकोलस शापूइ

बीजिंग/वॉशिंग्टन – ‘साऊथ चायनासी’मधील चीनच्या ‘वूल्फ वॉरियर डिप्लोमसी’ अर्थात शिकारी राजकीय धोरणाविरोधात अमेरिका आणि युरोपिय महासंघाने एकत्र येणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर ‘साऊथ चायनासी’च्या या क्षेत्रातील देशांशी समन्वय वाढवून चीनची बळजबरी रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन युरोपिय महासंघाने चीनसाठी नियुक्त केलेले राजदूत निकोलस शापूई यांनी केले. अमेरिकेतील बायडेन प्रशासनाकडून अपेक्षा असल्याचा दावा शापूई यांनी केला. दरम्यान, अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर चीनच्या युद्धनौकांनी लाईव्ह फायर युद्धसराव सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

चीनमधील ऊर्जा परिसंवादात बोलताना शापूई यांनी अमेरिकेतील सत्ताबदलाकडून युरोपिय महासंघाला फार मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगितले. ‘चीनबरोबर ज्या मुद्यावर सहमती असेल, त्यावर सहकार्य केले जाईल. पण जिथे चीनशी सहमती होऊ शकत नाही, तिथे चीनचा विरोध केलाच पाहिजे’, असे शापूई यांनी जाहीर केले. प्रामुख्याने ‘साऊथ चायना सी’विषयी चीनच्या आक्रमक धोरणांशी अमेरिका व युरोपिय महासंघ सहमत नसल्याचे शापूई यांनी स्पष्ट केले.

शेजारी देशांवर दादागिरी करणाऱ्या आणि धाकदपटशाहीचे धोरण राबविणाऱ्या चीनला विरोध केलाच पाहिजे. त्याचबरोबर चीनच्या सक्तीच्या आणि शिकारी राजकीय धोरणांविरोधात अमेरिका आणि युरोपिय महासंघामध्ये एकजूट आवश्‍यक असल्याचे युरोपिय महासंघाच्या राजदूतांनी स्पष्ट केले. ‘साऊथ चायना सी’च्या मुद्यावर अमेरिका आणि युरोपिय महासंघाने असियान सदस्य देशांशी समन्वय साधला पाहिजे. तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे देश देखील ‘साऊथ चायना सी’च्या भूमिकेवर अमेरिका व युरोपिय महासंघाशी सहमत असतील, असा विश्‍वास शापूई यांनी व्यक्त केला.

इंधन व खनिजसंपत्तीने संपन्न असलेल्या ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रावर चीन, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, ब्रुनेई, मलेशिया आणि तैवान हे देश हक्क सांगत आहेत. पण चीनने अन्य देशांचा अधिकार नाकारून येथील जवळपास 90 टक्के सागरी क्षेत्र आपल्याच मालकीचे असल्याचे धमकावले आहे. दरम्यान, चीनच्या मुद्यावर समविचारी देशांना विश्‍वासात घेणार असल्याचे अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. त्याचवेळी बायडेन यांचे चीनविषयक धोरण उदार असेल, असा दावाही केला जातो. त्यामुळे बायडेन यांच्या चीनविषयक धोरणावर सगळ्यांच्याच नजरा खिळलेल्या आहेत.

‘साऊथ चायना सी’च्या मुद्यावर युरोपिय महासंघाकडून अमेरिकेला एकजुटीचे आवाहन केले जात असताना, चीनने सदर सागरी क्षेत्रात अमेरिकेच्या युद्धनौकेला चिथावणी दिल्याची माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी अमेरिकेची ‘युएसएस मॅकिन आयलँड’ आणि ‘युएसएस सोमरसेट’ या ॲम्फिबियस युद्धनौकांनी ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर चीनच्या यांगझोऊ, गुआंग्वान आणि एन्शी या विनाशिकांनी अघोषित लाईव्ह फायर सराव सुरू केला. चीनच्या विनाशिकांचा हा युद्धसराव म्हणजे अमेरिकेच्या युद्धनौकांसाठी इशारा असल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत.

leave a reply