निवडणुकीचा वाद सोडविण्यासाठी लष्कराचा वापर अमेरिकेला धोकादायक व घटनाबाह्य मार्गावर नेणारा ठरेल

- अमेरिकेच्या १० माजी संरक्षणमंत्र्यांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेतील निवडणुकांच्या निकालावर आक्षेप घेण्याची वेळ निघून गेली असून, हा गुंता सोडविण्यासाठी लष्कराचा वापर करण्याचे प्रयत्न या देशाला धोकादायक मार्गावर नेऊन ठेवतील, असा गंभीर इशारा दहा माजी संरक्षणमंत्र्यांनी दिला?आहे. अमेरिकेत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटस् पक्षाच्या ज्यो बायडेन यांना सर्वाधिक मते मिळाली असून, ‘इलेक्टोरेल कॉलेज’ या यंत्रणेनेही त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदानात गैरव्यवहार झाल्याचे आरोप करून, निकाल फिरविण्यासाठी विविध मार्गांची चाचपणी सुरू केल्याचे आरोप करण्यात येत होते. त्यात ‘मार्शल लॉ’ लागू करण्याच्या पर्यायाचाही समावेश असल्याची चर्चा लष्करी तसेच राजकीय वर्तुळात सुरू होती.

अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकांपैकी एक ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या स्वतंत्र लेखात माजी संरक्षणमंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या घटनाक्रमावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ‘अमेरिकेत निवडणुका होऊन गेल्या आहेत. फेरमोजणी व परिक्षणाची प्रक्रियाही पार पडली आहे. देशातील न्यायालयांनी यासंदर्भातील याचिकांवर आपले निर्णय दिले आहेत. विविध प्रांतांच्या गव्हर्नर्सनी निकालाचे प्रमाणपत्रही दिले आहे. इलेक्टोरल कॉलेजनेही मतदान केले आहे. निकालांवर शंका उपस्थित करण्याची वेळ आता निघून गेली आहे’, असे मत माजी संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केले. आता संसदेने इलेक्टोरल कॉलेजच्या मतांना मान्यता देण्याची प्रक्रिया पार पडायला हवी, असे आवाहनही माजी मंत्र्यांकडून करण्यात आले आहे.

‘निवडणुकांशी संबंधित वाद सोडविण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराला सहभागी करून घेण्याचे प्रयत्न आपल्याला धोकादायक, बेकायदेशीर व घटनाबाह्य मार्गावर नेऊन ठेवतील. यासाठी आदेश देणार्‍या नागरी तसेच लष्करी अधिकार्‍यांना यासाठी जबाबदार धरले जाईल. त्यांच्या कारवायांमुळे अमेरिकी प्रजासत्ताकाला गंभीर परिणाम भोगावे लागतील व त्यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाची कारवाईही होऊ शकते’, अशा शब्दात अमेरिकेच्या १० माजी संरक्षणमंत्र्यांनी बजावले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून, सत्तेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडण्यात अडथळे येत असल्याच्या वृत्तांवरही लेखात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

लेख लिहिणार्‍या व त्यावर स्वाक्षरी करणार्‍या माजी संरक्षणमंत्र्यांच्या यादीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कारकिर्दीत काम केलेल्या जेम्स मॅटिस व मार्क एस्पर या दोन माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. त्याव्यतिरिक्त डिक चेनी, विल्यम पेरी, डोनाल्ड रम्सफेल्ड, विल्यम कोहेन, रॉबर्ट गेट्स, लिऑन पॅनेट्टा, चक हेगेल व अ‍ॅश कार्टरदेखील सहभागी झाले आहेत. गेल्या महिन्यात, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विट करून ‘मार्शल लॉ=फेक न्यूज’ असे सांगून हा वाईट पत्रकारितेचा भाग असल्याची टीका केली होती. तर, आर्मी सेक्रेटरी रायन मॅक्कार्थी व लष्करप्रमुख जनरल जेम्स सी. मॅक्कॉनविल यांनी संयुक्त निवेदन जारी करून, ‘अमेरिकेतील निवडणुकीचा निकाल ठरविण्यात अमेरिकी लष्कराची काहीही भूमिका नाही, असा खुलासा केला होता.

leave a reply