नवी दिल्ली – कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशात डिजिटल पेमेंटच्या व्यवहारात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. भारताने स्वतंत्ररित्या विकसित केलेल्या ‘युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस’द्वारे (यूपीआय) होणाऱ्या व्यवहारात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. एकट्या ऑक्टोबर महिन्यात देशभरात ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस बेस्ड ट्रान्झॅक्शन’द्वारा (यूपीआय) विक्रमी २.०७ अब्ज व्यवहारांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ‘युपीआय’च्या माध्यमातून होणाऱ्या डिजीटल व्यवहारांमध्ये तब्बल ८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
‘यूपीआय’ या डिजीटल ॲपद्वारे ऑक्टोबर महिन्यात २०७.१६ कोटी व्यवहार झाले आहेत. यूपीआयमार्फत गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर २०१९ मध्ये एक अब्ज व्यवहारांचा टप्पा ओलांडण्यात आला होता. त्यात वर्षभरात ८० टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. या व्यवहारांचे एकूण मूल्यही सुमारे १०१ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात १,९१,३५९.९४ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. तर ऑक्टोबर २०२०मध्ये झालेल्या व्यवहारांचे मूल्य ३,८६,१०६ कोटी रुपये आहे. ऑक्टोबर महिन्यात ‘युपीआय’द्वारे झालेले व्यवहार ही आजवरची सर्वाधिक आकडेवारी असल्याची माहिती नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली आहे.
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून(एनपीसीआय) २०१६ साली ‘यूपीआय’ विकसित करण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीत युपीआयने १ अब्ज व्यवहारांचा टप्पा ओलांडला होता. आता अवघ्या वर्षभरात या ॲपद्वारे २ अब्जांहून अधिक व्यवहारांची नोंद झाली आहे. भारताने विकसित केलेल्या स्वदेशी ॲपला मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जाते. ‘भीम यूपीआयने गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहाराचा चेहरा बदलण्यास सुरूवात केली आहे. सुरक्षित व्यवहार यामागचे कारण आहे’, असे ‘एनपीसीआय’च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मार्च महिन्यात जाहीर झालेल्या लॉक डाऊननंतर एप्रिल-मे महिन्यात ‘यूपीआय’ वापरणाऱ्यांच्या संख्येत थोडीशी घट झाली होती. परंतु त्यानंतर, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवरही भारतीय जनतेने यूपीआयवर विश्वास ठेवल्याचे दिसत आहे. जूनपासून यूपीआयचा वापर करणाऱ्यांची संख्या आणि व्यवहारांची वेगाने वाढ झाली.
‘एनपीसीआय’ची सुरूवात २००८ साली झाली. ही देशातील ‘पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम’ची जबाबदारी पार पाडणारी मुख्य संस्था आहे. ‘एनपीसीआय’ने डिजिटल व्यवहारांसाठी विविध उत्पादने विकसित केली आहेत. यामध्ये रुपे कार्ड, ‘इन्स्टंट पेमेंट सर्व्हिस’ (आयएमपीएस), यूपीआय, भारत इंटरफेस फॉर मनी (बीएचआयएम), भीम आधार (बीएचआयएम आधार), ‘एनईटीसी फास्टॅग’ आणि ‘भारत बिल पे’ यांचा समावेश आहे.